नारळाचा कीस, शेंगदाण्याचा कूट, सोललेला लसूण यांच्या पाकिटांना मागणी

आजवर केवळ प्रदर्शनांमध्ये उत्पादन मांडून तुटपुंजा अर्थिक नफा मिळवतानाही कसरत कराव्या लागणाऱ्या ठाण्यातील बचतगटांना आता मुंबईतील बडय़ा मॉलमधील बाजार खुणावू लागला आहे. नारळाचा कीस, शेंगदाण्याचा कूट, किसलेले सुके खोबरे, निसलेला लसूण अशा एरवी लहान भासणाऱ्या मात्र जेवणात मोठे महत्त्व राखणाऱ्या जिन्नसांची मागणी वाढू लागली असून अलीकडे मोठमोठय़ा मॉलमध्येही हे जिन्नस विकले जाऊ लागले आहेत. त्यामुळे ठाण्यातील बचत गटांचा व्यवसाय भरभराटीस येऊ लागला आहे.

विविध शहरांमध्ये महिला बचत गट तयार करून पापड, लोणची अशी उत्पादने तयार करून विकली जातात. मात्र, अशी उत्पादने विकण्यासाठी या बचतगटांना विविध ठिकाणी होणारी प्रदर्शने किंवा स्वत:ची कार्यालये असे मर्यादित पर्याय उपलब्ध होते. त्यामुळे या उत्पादनांना ग्राहकांची पसंती मिळत असली तरी, त्यांना उठाव मर्यादित होता. हीच बाब हेरून ठाण्यातील बचतगटांच्या महिलांनी मुंबई, ठाण्यातील मॉल व्यवस्थापनासोबत बोलणी सुरू केली होती. समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेने या कामी पुढाकार घेत हायपरसिटी या मोठय़ा मॉलचे दरवाजे बचतगटांच्या उत्पादनासाठी खुले करून दिले.

 लहान पदार्थाना मोठी मागणी

बचतगटांनी बाजारातील बदलते प्रवाह आत्मसात करून आपल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दण्यासाठी प्रयत्न केले. काही बडय़ा मॉल्सच्या व्यवस्थापनाला भेटी देऊन आपल्या उत्पादनांची माहिती दिली. या माध्यमातून ओल्या नारळाचा कीस, चिरलेल्या भाज्या, सोललेले लसूण, किसलेले सुके खोबरे, शेंगदाण्याचा कूट यांसारख्या उत्पादनांना या ठिकाणी मोठी मागणी असल्याचे चित्र आहे. दर आठवडय़ाला तब्बल साठ किलोचा ओल्या नारळाचा कीस या बचतगटाकडून मॉल्सना पुरविला जातो. या माध्यामातून उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याच्या उद्देशाने सध्या काम सुरू आहे, अशी माहिती समर्थ भारत व्यासपीठ बचत गटाच्या सदस्या सुजाता बोराडे यांनी दिली.

कोणतेही खाद्य उत्पादन विक्री करताना, त्याच्या स्वच्छतेच्या बाबी आम्ही कटाक्षाने पाळतो. बचत गटांच्या कामामधील स्वच्छता आणि कामाची पद्धत पाहून आम्ही या गटांचे उत्पादन खरेदी केले. तसेच बचतगटांच्या महिलांसाठी काही तरी करण्याची संधी या निमित्ताने आम्हाला मिळाली.  – प्रशांत मगर, हायपर सिटीमॉल खाद्य विभाग प्रमुख

काम आणि घर अशा दुहेरी भुमिका निभावताना तारेवरची कसरत करावी लागते. कामावर जाणाऱ्या महिलांचा घरकामातील भार कमी व्हावा यासाठी बचत गट नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यामुळे कार्यालयातुन घरी आल्यावर सहज स्वयंपाक करता यावा, यासाठी बचत गटाच्या माध्यामातुन विविध उत्पादनांची निर्मिती करण्याचा आमचा मानस आहे.  – आरती नेमाणे,  समर्थ भारत व्यासपीठच्या समन्वयक