डोंबिवली – येथील ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका शुभदा पावगी (७९) यांच्या गळ्यातील सोन्याचा दोन लाख रुपये किमतीचा ऐवज दुचाकीवरून आलेल्या दोन भुरट्या चोरांनी सर्वाधिक वर्दळीच्या टिळक रस्त्यावरून लांबविला आहे. चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही, असा प्रश्न यानिमित्ताने नागरिकांकडून केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्येष्ठ गायिका पावगी यांनी याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्हीमधील चित्रिकरण तपासून चोरट्यांचा तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले, ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका शुभदा पावगी रविवारी रात्री नऊ वाजता फडके रस्त्यावरील गणपती मंदिरामधील नाट्य संगीताचा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या मुलासोबत टिळक रस्त्यावरील आपल्या घरी पायी चालल्या होत्या. टिळक रस्त्यावरील ब्राह्मण सभेजवळील एका दुकानासमोरून जात असताना शुभदा पावगी यांच्या समोरून एक लाल रंगाची दुचाकी आली. त्यावर दोन जण बसले होते. दुचाकी अचानक शुभदा यांच्या समोर आली. त्या थोड्या बाजुला झाल्या. तेवढ्यात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या भुरट्या चोराने शुभदा यांच्या मानेवर जोराची थाप मारून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, सोन्याचे मंगळसूत्र जोराने हिसकले. त्यांच्या गळ्याला ऐवज हिसकताना फटका बसल्याने जखम झाली आहे. ऐवज हिसकल्यानंतर ओरडा करण्याच्या आत भुरटे चोर दुचाकीवरून पसार झाले.

हेही वाचा – शिवसेना नाव आणि चिन्ह मिळताच ठाण्यात शिंदेगटाकडून शाखा ताब्यात घेण्यास सुरुवात, लोकमान्यनगर शाखेच्या वादातून राडा

हेही वाचा – मध्य, पश्चिम रेल्वे स्थानकांवर रेल नीरचा तुटवडा; उन्हाचा चटका वाढल्याने पाण्याची मागणी वाढली

चोर वर्दळीच्या रस्त्यावर येऊन चोऱ्या करू लागल्याने त्यांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही, असा प्रश्न नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women singer mangalsutra stolen by thief on bike in dombivli ssb