लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : मुंब्रा येथे अल्पवयीन मुलीला घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आसिफ मन्सुरी याला अटक केली होती. बुधवारी पोलिसांचे पथक त्याला घेऊन जात असताना न्यायालयाबाहेर महिलांनी त्याला चोप देण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी आरोपीला दुसऱ्या ठिकाणाहून नेले.
मुंब्रा येथे राहणाऱ्या आसिफ मन्सुरी या तरुणाने परिसरातील एका १० वर्षीय मुलीला खेळणी देण्याची बतावणी करुन तिला घरामध्ये नेले होते. त्यानंतर तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केले. तसेच तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मुलीला स्वच्छतागृहातील डक्टमधून खाली फेकून दिले. या प्रकरणात पोलिसांनी आसिफ मन्सुरी याला अटक केली होती. या प्रकारनंतर मुंब्रा शहरातील नागरिकांनी मोर्चे काढले होते. मन्सुरी याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत होते. बुधवारी मन्सुरी याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाच्या आवारात मुंब्रा येथील काही महिला उपस्थित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) मर्जिया पठाण यांनी महिला सहकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मन्सूरी याला शिवीगाळ तसेच मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी त्याला दुसऱ्या ठिकाणाहून बाहेर काढले.
या संदर्भात मर्जिया पठाण यांनी सांगितले की, मयत चिमुरडीची जात – धर्म शोधून त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे. पण, माझ्या मते ती एक मुलगी होती, माझी छोटी बहिण होती. एवढेच महत्वाचे आहे. अशा पद्धतीने अत्याचार होत असतील तर नराधमांना भीती वाटेल, असे काम आपण करायला हवे. देशात दररोज शेकडो महिलांवर बलात्कार होत आहेत. हजारो महिलांचे विनयभंग होत आहेत. अशा स्थितीत त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ज्या सरकारची आहे. ते सरकार वक्फ सारखे विषय आणून धार्मिक विद्वेष पसरवित आहे.
वास्तविक पाहता, शक्ती कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली असती तर असे प्रकारच घडले नसते. पण, सरकारला महिलांच्या सुरक्षेपेक्षा मतांसाठी धार्मिक तेढ निर्माण करण्यात अधिक स्वारस्य आहे. जर, चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या मन्सूरीचा खटला जलदगती न्यायालयात चालविला नाही आणि तो जर जामिनावर सुटला तर तो दिसेल तिथे आम्ही पुन्हा प्रसाद देऊ. त्याची जबाबदारी ही सरकारची असेल, असा इशाराही मर्जिया पठाण यांनी दिला.