बदलापूरः उल्हास नदीत होणाऱ्या प्रदुषणामुळे जलपर्णीची मोठी चादर नदीवर तयार झाली आहे. ही जलपर्णी काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून यंत्रे आणली जात असतानाच आता या जलपर्णीचा पुनर्वापर करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सरसावले आहे. जलपर्णीच्या माध्यमातून शोभीवंत वस्तूंची निर्मिती करत विक्रीच्या माध्यमातून महिलांना रोजगार देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी लवकरच महिलांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील ५० लाखांहून अधिकची लोकसंख्या ज्या उल्हास नदीवर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असते. त्या उल्हास नदीत नागरी सांडपाणी जमा होत असल्याने नदीवर जलपर्णीची चादर तयार झाली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी कमी होत असून पाणी उचल करणेही अवघड होते आहे. सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी सातत्याने या जलपर्णीवर तोडगा काढण्यासाठी आंदोलने करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला नुकतेच यश आले.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आता ही जलपर्णी काढण्यासाठी यंत्रे पुरवली जाणार आहेत. त्याचवेळी उल्हास नदीत जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी कृती आराख़डा तयार केला जाणार आहे. यंत्रांमुळे मोठ्या प्रमाणावर जलपर्णी नदीतून काढली जाईल. मात्र आता जिल्हा परिषद प्रशासनाने या जलपर्णीचाही पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
या जलपर्णीपासून विविध वस्तूंची निर्मिती करून महिला बचत गटांना लाभ देण्याची योजना ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने आखली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी नुकतीच उल्हास नदीची पाहणी केली. जलपर्णी काढल्यानंतर तीच्यावर प्रक्रिया करून त्यापासून विविध वस्तू तयार केल्या जाऊ शकतात. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर त्यांना जागा आणि जलपर्णी उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे जलपर्णी काढल्यानंतर निर्माण होणारी समस्याही सुटणार असून महिलांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
प्रतिक्रियाः चंद्रपूर येथे असताना आम्ही हा प्रयोग यशस्वी केला होता. त्यानुसार आम्ही सर्वप्रथम महिलांना प्रशिक्षण देणार आहोत. त्यानंतर त्यांना साहित्य निर्मितीसाठी सहकार्य करू. यातून महिलां रोजगारही मिळेल. येत्या काही दिवसात प्रशिक्षण सुरू होईल. – रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे.
चौकटः कशी होते साहित्य निर्मिती जलपर्णी काढल्यानंतर सुकवली जाते. त्यासाठी त्यातील पाणी काढले जाते. जलपर्णीतून फायबर मिळवले जाते. त्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्यापासून आपल्याला हव्या त्या वस्तू तयार करता येतात. शोभेच्या, वापराच्या वस्तू त्यातून तयार होऊ शकतात. जलपर्णीपासून पिशव्या, पाकिटे, शोभेच्या वस्तू तयार होऊ शकतात.