वसई, नायगावमधील मच्छीविक्रेत्या महिलांचा मुंबई, ठाणे परिसरात मासळी विकून संसाराला हातभार

हवामानाच्या बदलांमुळे मासेमारी व्यवसायावर परिणाम होतो. कधी कधी मच्छीमारांना मासेही मिळत नाहीत, अशा वेळी खचून न जाता आपल्या साथीदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून संसाराचा गाडा हाकण्याचे काम कोळी महिला करत असतात. घरातील कर्त्यां पुरुषाकडे काम नसेल तरीही वसई, नायगावमधील कोळी महिला अगदी मुंबई, ठाणे परिसरात जाऊन मासळी विकून परिवाराचा उदरनिर्वाह करत असतात.

वसई किनारपट्टी भागांत २० ते २५ गावांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. इथली हजारच्या आसपास कुटुंबे प्रत्यक्ष मासेमारी करतात, तर आणखी कुटुंबे मासेमारीशी संबंधित व्यवसायांत आहेत. मासेमारी करण्यासाठी वसईतील मच्छीमार केळवा, डहाणू अगदी गुजरात हद्दीपर्यंत जातात. या ठिकाणी ४० ते ५० हजार खर्च करून १० ते १२ दिवस मासेमारीसाठी बोटीमध्येच राहतात. येथून मासेमारी करून आणलेली मासळी नायगाव आणि पाचूबंदर येथील मोठय़ा मासळी बाजारात लिलाव पद्धतीने विकण्यास काढतात, परंतु ही मासळी लिलाव पद्धतीने घेतल्यानंतर ती योग्य भावात विकणे हेही कौशल्य आहे. हेच काम वसई, नायगाव येथील मच्छीमार महिला करत असून यामुळेच येथील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मुंबई बाजारात मासळी विकण्यापासून ते घर सांभाळण्यापर्यंतचा प्रवास वसई, नायगाव कोळीवाडय़ातील सखुबाई होळकर, मंजुळा भाटकर, रजनी कोळी, प्रीती वैती, वसुंधरा फाटक, नंदिनी वैती, संगीत भाईंदरकर, भागीरथी बोकाले, रेखा धांगेकर या महिलांनी उलगडला आहे.

मुंबईमध्ये मासळीची मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, गोवा या राज्यातून मासळी मुंबई बाजारात विकण्यास येते. त्यामध्ये वसईची मासळी ही ताजी असल्याने आणि वसईतील कोळी महिलांवर असलेल्या विश्वासामुळे साहजिकच सर्व ग्राहकांचा कल हा वसईच्या मासळीकडे वळतो, असे रजनी कोळी यांनी सांगितले. या मासळी बाजारात या सर्व महिलांसह एकूण ५७ महिला वसईची मासळी विकण्यासाठी मुंबईच्या बाजारपेठेमध्ये जातात. त्यांची दिनचर्या सकाळी ३ वाजल्यापासून सुरू होऊन रात्री १२ वाजेपर्यंत चालते. वसईमध्ये रात्री १० वाजता मासळी बाजार भरतो. या ठिकाणाहून या महिला मासळी विकत घेतात. त्यानंतर पहाटे ३ वाजता उठून परिवारासाठी जेवण, डबा अशी सर्व घरकामे करून मग ५.१७ ची लोकल पकडून मुंबई बाजारात ६.३० पर्यंत दाखल होतात. मासळी विकून झाल्यानंतर पुन्हा येथून दुपारी २ वाजेपर्यंत घरी येत असल्याचे या महिलांनी सांगितले. मग पुन्हा रात्रीच्या बाजारात ज्या व्यापाऱ्याकडून मासळी घेतली त्यांचा हिशेब करणे, इतर घरकामे हा दिनक्रम सुरूच असल्याचे रजनी कोळी यांनी सांगितले.

परवाना देण्याची मागणी

मासेविक्रेत्या महिलांची परवड होत आहे. घरातील कर्त्यां पुरुषाला आधार देण्याचे काम आम्ही करतो. मात्र आमची अशीच परवड होत राहिली तर मासेमारी व्यवसाय कोलमडून जाईल. आज महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही राज्य सरकारकडे महिलांसाठी मासळीविक्रीचा कायमस्वरूपी परवाने उपलब्ध करून देण्याची मागणी करत आहोत, असे या महिलांनी सांगितले.

समस्यांचा सामना

मुंबईला मोठी बाजारपेठ असल्याने तसेच स्वातंत्रपूर्व काळापासून वसईतील कोळी महिला तिथे जातात. मात्र या बाजारात असंख्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथे असलेल्या मासळी बाजारावर कोणत्याही प्रकारे छत नाही, तर दिवसभर ऊन, पावसात सहा तास उभ्यानेच मासळी विकावी लागत आहे. येथील मोठी समस्या म्हणजे येथे असणारे परप्रांतीय मासेविक्रेते. वसईची मासळी सांगून रसायनेमिश्रित मासळी ग्राहकांच्या माथी मारण्याचे प्रकार येथे मोठय़ा प्रमाणावर चालतात, तसेच कोणत्याही प्रकारची सुविधा नसताना बाजारकर या महिलांना भरावा लागत आहे, तसेच त्यांना अजूनही परवाने उपलब्ध झाले नाही, असे प्रीती वैती यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर अडीच ते तीन महिने सरकार मासेमारीबंदी कालावधी घोषित करते. या काळात मासळी उपलब्ध न झाल्याने गेल्या ६ ते ७ महिन्यात जे कमावलेले आहे, त्यावरच संपूर्ण कुटुंबाची गुजराण करावी लागत असल्याचे रेखा धांगेकर यांनी सांगितले.

Story img Loader