निखिल अहिरे

समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांसाठी काम करण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र आपल्या वैयक्तिक आयुष्यावर त्याचा परिणाम नको या विचाराने अनेकांची पाऊले मागे सरकतात. या सर्व गोष्टींना छेद देत आपण समाजाचे काही देणे लागतो या हेतून डॉ स्वाती सिंग या मागील सात वर्षांपासून भिवंडीतील हनुमान टेकडी परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाना हळूहळू यश मिळत असून हनुमान टेकडी परिसरात देहविक्री व्यवसाय करणाऱ्या एकूण महिलांपैकी १० टक्के महिला पूर्णतः या व्यवसायातून बाहेर पडल्या असून त्यांनी नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे.

देहविक्री करणाऱ्या महिलांचे पुनर्वसन व्हावे त्यांना समाजात एक स्थान मिळावे त्यांच्या मुलांना शैक्षणिक सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी डॉ.स्वाती सिंग या त्यांच्या श्री साई सेवा संस्थेमार्फत मागील सात वर्षांपासून रेड लाईट विभाग म्हणून ओळख असलेल्या भिवंडीतील हनुमान टेकडी परिसरात काम करत आहेत. डॉ.स्वाती सिंग या सध्या भिवंडी येथील मोठ्या रुग्णालयात व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत. या ठिकाणी काम करत असतांना काही अंतरावर असणाऱ्या हनुमान टेकडी परिसरातील देहविक्रय व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी काही चांगले कार्य करता यावे यासाठी सात वर्षांपूर्वी श्री साई सेवा संस्थेची त्यांनी स्थापना केली. त्यानंतर संस्थेद्वारे देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. या उपक्रमांद्वारे तेथील महिलांशी एक विश्वासाचे नाते तयार झाले. त्यामुळे काही महिलांना व्यवसायातून बाहेर काढणे सोपे झाल्याचे डॉ.स्वाती सिंग यांनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले. भिवंडीतील हनुमान टेकडी परिसरात सध्यस्थितीत या महिलांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा महिला आणि बाल विकास विभागातर्फे मोठा प्रकल्प राबविला जात आहेत. यात डॉ.स्वाती सिंग देखील महत्वाची भूमिका बजावत आहे.

भिवंडी येथील हनुमान टेकडी परिसरात सुमारे ४०० महिला देहविक्री व्यवसाय करतात. डॉ.स्वाती सिंग यांच्या संस्थेतर्फे यातील अनेक महिलांचा बचत गट स्थापन करण्यात आले असून महिलांचे चांगले अर्थार्जन देखील होत आहे. तेथील महिलांना संगणकीय प्रशिक्षण दिले जात आहे. याचेच फलित म्हणून अनेक महिला आज जिल्ह्यातील प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये आणि सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत. स्वाती यांच्या पुढाकाराने आणि जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या मदतीने या महिलांच्या मुलांना देखील शैक्षणिक प्रवाहात आणले गेले आहे तर काही मुलं-मुली नोकरीला देखील लागले आहेत.

“देहविक्री करणाऱ्या महिलांना मुख्य प्रवाहात आण्यासाठी आणि त्यांचे आयुष्य त्यांना नव्याने जगता यावे यासाठी संस्थेतर्फे अविरतपणे कार्य केले जात आहे. या महिलांसाठी काम करण्याचे एक वेगळेच समाधान मिळत आहे. या महिलांच्या पुनर्वसनासाठीच्या कार्याची ही एक प्रकारे सुरवात आहे. येथील सर्व महिलांना समाजात एक स्थान मिळावे यासाठी प्रयत्न सुरु आहे,” असं श्री साई सेवा संस्थेच्या संस्थापिका डॉ स्वाती सिंग यांनी सांगितलं आहे.

Story img Loader