भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना २४ तास पाणी देणाऱ्या सूर्या धरण पाणीयोजनेचे भूमिपूजन होऊन मंगळवारी एक वर्ष उलटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झालेली ही योजना ३४ महिन्यांत पूर्ण करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र एक वर्ष उलटल्यानंतरही योजनेच्या कामाला अद्याप सुरुवातच झाली नसल्याने दिलेल्या मुदतीत ही योजना पूर्ण होणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सूर्या धरण पाणीयोजनेचे भूमिपूजन करण्यात आले. योजनेचा अवधी ३४ महिन्यांचा असला तरी त्याआधीच हे काम पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. या घोषणेचा भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत भरभरून उपयोग झाला आणि महापालिकेत भाजपने सत्ता स्थापन केली, परंतु भूमिपूजनला वर्ष उलटले तरी योजनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवातही झालेली नाही. सूर्या धरण पाणीयोजनेसोबतच शहरातील तीन मुख्य रस्त्यांच्या कामांची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. रस्त्यांची कामे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सुरू होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, परंतु रस्त्यांची निविदा प्रक्रिया होण्याव्यतिरिक्त या विकासकामांचे गाडे पुढे सरकलेले नाही.

पाणी ही मीरा-भाईंदरसाठी ज्वलंत समस्या आहे. सूर्या धरण पाणी योजनेमुळे शहराला तब्बल २१८ दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. यामुळे शहराची पाणीटंचाई कायमची दूर होणारच आहे, शिवाय नागरिकांना २४ तास पाणी मिळेल, असा महापालिकेचा दावा आहे. ही योजना मीरा-भाईंदर आणि वसई-विरार या दोन्ही शहरांसाठी मुंबई महानगर प्रादेशिक प्राधिकरण (एमएमआरडीए) करत आहे. ८८ किमी लांबीच्या या योजनेसाठी १३२९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

निविदेनुसार एमएमआरडीएने नेमलेला कंत्राटदार ३४ महिन्यांच्या कालावधीत सूर्या धरणाचे पाणी मीरा-भाईंदर आणि वसई-विरार शहराच्या प्रवेशद्वारावर आणून देणार आहे. मात्र दिलेल्या कालावधीतील १२ महिने उलटून गेल्यानंतरही योजनेच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे काम नियोजित कालावधीतही पूर्ण होणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सूर्या धरण योजनेतील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाला सूर्यानगर कॉलनी येथे सुरुवात करण्यात आली होती, परंतु स्थानिकांच्या विरोधामुळे हे काम बंद पडले आहे. पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर या प्रकल्पाच्या कामाच्या तांत्रिक सर्वेक्षणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. जलवाहिनी अंथरण्यासाठी आवश्यक असलेली वनविभागाची परवानगी येत्या आठ दिवसात हाती पडेल. त्यानंतर विवाद नसलेल्या जागेत जलवाहिनी अंथरण्याच्या कामाला सुरुवात होईल.

-हनुमंत सोनावणे, कार्यकारी अभियंता, एमएमआरडीए

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Work for surya dam water project not yet started in mira bhayander