डोंबिवली – टिटवाळा-शिळफाटा-हेदुटणे या ३० किलोमीटर लांबीच्या बाह्यवळण रस्ते मार्गातील दुर्गाडी ते मोठागाव (माणकोली उड्डाण पूल) रस्त्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केले आहे. या रस्ते मार्गातील सुमारे ६० टक्क्याहून अधिक जमिनीचे भूसंपादन करून ही जमीन पालिकेने एमएमआरडीएकडे हस्तांतरित केली आहे. त्यामुळे डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर, गणेशनगर, देवीचापाडा भागातील वळण रस्त्याची कामे प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आली आहेत.
दुर्गाडी ते मोठागाव-माणकोली उड्डाण पूल हा सात किलोमीटर लांबीचा वळण रस्त्याचा एका टप्पा आहे. हा टप्पा क्रमांक तीन म्हणून ओळखला जातो. या रस्ते कामासाठी शासनाने दीड वर्षापूर्वी सुमारे ५६१ कोटीचा निधी मंजूर केला. या जमिनीचे १०० टक्के जमीन मालकांकडून भूसंपादन करून ही जमीन कागदोपत्री प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावी, मगच प्राधिकरण हे रस्ते काम सुरू करील असे प्राधिकरणाच्या वरिष्ठांनी वेळोवेळी कल्याण डोंबिवली पालिकेच्या अधिकाऱ्यांना बजावले होते. या आदेशाप्रमाणे पालिकेने दुर्गाडी किल्ला ते मोठागाव बाह्यवळण रस्ते मार्गातील सुमारे साठ टक्क्याहून अधिक जमीन भूसंपादित केली आहे. या रस्ते मार्गात काही ठिकाणी रेल्वे, सरकारी जमीन आहे.
हेही वाचा – ज्येष्ठ महिला चोरट्यांचे ‘लक्ष्य’ पर्वती, लोकमान्यनगर भागात दागिने चोरीच्या घटना
डोंबिवलीत राजूनगर, गणेशनगर, देवीचापाडा ते मोठागाव माणकोली पुलाच्या दिशेने या वळण रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या रस्तेमार्गातील बाधित काही जमीन मालक रोख मोबदल्यासाठी अडून बसले आहेत. या रस्ते कामाची शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ, अभियंता अजय महाजन यांनी पाहणी केली. यावेळी माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे उपस्थित होते.
डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाकडून येणारे मुख्य वर्दळीचे रस्ते वळण रस्ते मार्गाला जोडण्यात येणार आहेत. महात्मा फुले रस्ता, सुभाष रस्ता, सत्यवान चौक देवीचापाडा पाडा रस्ता, गणेशनगर कुंभारखाणपाडा रस्ता हे रस्ते वळण रस्ते मार्गाला जोडण्यात येणार आहेत. या वळण रस्ते मार्गामुळे डोंबिवली पश्चिमेतील वाहन चालक, मालक पूर्व भागात, ९० फुटी रस्त्यावर न येता वळण रस्ते मार्गाने थेट कल्याण, ठाणे, भिवंडी दिशेने जाऊ शकणार आहे. पोहच रस्ते मार्गावरील श्रीधर म्हात्रे चौकातील काही अतिक्रमणे पालिकेने तोडली. तर काही अतिक्रमणे स्थानिक राजकीय मंडळींनी आपल्या मतपेटीला धक्का नको म्हणून तोडून देण्यास विरोध केला असल्याचे पालिकेतील चर्चेतून समजते.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधून बांगलादेशी पती-पत्नीला अटक; एटीबीची कारवाई, आठ दिवसांपासून हॉटेलमध्ये…
मोठागाव ते दुर्गाडी, माणकोली पूल ते शिळफाटा वळण रस्त्याने बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला देऊन भूसंपादनाची प्रक्रिया पालिकेने सुरू करावी. आणि हे वळण रस्ते काम लवकर सुरू करावे. – दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक.