लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : महापालिकेकडून निधी उपलब्ध होत नसल्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकात पुर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पादचारी पूलाची कामे रखडली होती. याबाबत टिका होऊ लागताच ठाणे महापालिका प्रशासनाने तातडीने पाच कोटी रुपयांच्या निधीचा धनादेश रेल्वे प्रशासनाला नुकताच सुपूर्द केला असून यामुळे रखडलेल्या त्या पादचारी पूलाची कामे पुन्हा सुरू होणार आहेत.
ठाणे रेल्वे स्थानकातून लाखो प्रवासी वाहतुक करतात. स्थानकात पुर्व आणि पश्चिम भागाला जोडणारे दोन पादचारी पूल उभारण्यात आले होते. यातील एक पूल कल्याण दिशेकडे आहे. तर दुसरा पूल मुंबई दिशेकडे आहे. ठाणे पूर्वेकडील कोपरी गाव, चेंदणी कोळीवाडा, अष्टविनायक चौक भागात राहणारे हजारो नागरिक कामानिमित्ताने ठाणे पश्चिम भागात जाण्यासाठी या पादचारी पूलांचा वापर करीत असत. परंतु हे दोन्ही पुल जीर्ण आणि धोकादायक झाले होते. यामुळे रेल्वे प्रशासनाने हे पुल पाडून त्या जागी नवीन पुल उभारणीचे काम हाती घेतले आहे. शिवाय, पारसिक बोगदा परिसरातही एक पादचारी पूल उभारण्यात येत आहे. या तीन पादचारी पूलांच्या कामासाठी ठाणे महापालिका रेल्वे प्रशासनाला २४ कोटी ९० लाख रुपये इतका निधी देणार होती.
महापालिकेने पहिल्या टप्प्यात आठ कोटी रुपयांचा निधी दिला होता. हा निधी मिळताच मुंबई दिशेकडील पादचारी पूल पाडून त्या जागी नवीन पुलाची उभारणीचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर पालिकेकडून पुन्हा चार कोटी रुपयांचा निधी रेल्वे प्रशासनाला देण्यात आले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने कल्याण दिशेकडील रेल्वे पूलाच्या कामाची सुरूवात केली. परंतु पुढील निधी उपलब्ध होत नसल्यामुळे पुलांचे काम रखडले होते. याबाबत टिका होऊ लागताच ठाणे महापालिका प्रशासनाने तातडीने पाच कोटी रुपयांच्या निधीचा धनादेश रेल्वे प्रशासनाला नुकताच सुपूर्द केला असून यामुळे रखडलेल्या त्या पादचारी पूलाची कामे पुन्हा सुरू होणार आहेत.
महिन्याभरापूर्वी रेल्वे प्रशासनाने येथील कल्याण दिशेकडील जुना पादचारी पूल नागरिकांसाठी बंद केला होता. त्यामुळे कोळीवाडा भागातून पश्चिम, सिडकोकडे किंवा सिडको येथून कोळीवाडा भागात जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले होते. यासंबंधीचे वृत्त लोकसत्ता ठाणे या सह दैनिकात ‘गर्दीचे शुक्लकाष्ठ कायम’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाले होते. तसेच खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाला जुना पूल सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. अखेर तात्पुरती दुरुस्ती करून हा पुल नवीन पुलाचे काम पुर्ण होईपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
ठाणे स्थानकात पूलाच्या निर्माणासाठी रखडलेला निधी महापालिकेने रेल्वे प्रशासनाला उपलब्ध करून दिला आहे. मध्य रेल्वेचे मुख्य प्रबंधक रजनीश गोयल यांच्याशी चर्चा करून पूलांची कामे तात्काळ सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. -राजन विचारे, खासदार, ठाणे.