डोंंबिवली – शिळफाटा रस्त्यावरील निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीसाठी लागणाऱ्या सीमेंट काँक्रीटच्या १९ भक्कम चौकटी बसविण्याचे आव्हानात्मक काम समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू विभागाच्या अभियंता, कामगारांनी शनिवारी रात्री पूर्ण केले. हे काम विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी शक्तिमान यांत्रिक यंत्रणा पुलाच्या परिसरात कुशल मनुष्यबळासह तैनात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे काम सोमवारी रात्री १२ वाजेच्या आत पूर्ण करण्याचे रेल्वेच्या अभियंत्यांचे लक्ष्य आहे.सीमेंट काँक्रीटच्या अवजड चौकटी उचलण्यासाठी ७०० टनाची क्रेन, क्रेनवरील चौकटी खेचण्यासाठी खेचकाम (पुलर) यंत्र याठिकाणी तैनात आहेत. निळजे रेल्वे पुलाचे काम सुरू करण्यापूर्वीच याठिकाणी काही दिवसापूर्वीच पुलाच्या चारही बाजु बंदिस्त करणाऱ्या काँक्रीटच्या भक्कम चौकटी निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या बाजुला आणून ठेवण्यात आल्या होत्या.

बुधवारी रात्रीपासून निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. हे काम पाच दिवसाच्या अवधीत कसे पूर्ण होणार याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता होती. पाच दिवस शिळफाटा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय वाहतूक विभागाकडून झाल्यानंतर पोकलेन, कापकाम यंत्रांच्या साहाय्याने रेल्वे पुलाच्या मार्गातील दगड, मातीचा धस दोन दिवसात कापून काढण्यात आला.

पुलाचे काम सुरू असताना या कामात शिळफाटा रस्त्यावरील वाहतुकीचा कोणताही अडथळा येऊ नये म्हणून वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, कोळसेवाडी वाहतूक विभागाचे सचिन सांडभोर, मुंब्रा, डोंबिवली वाहतूक विभागाचे कर्मचारी एकूण १५० शिळफाटा मुख्य रस्ता आणि पर्यायी आठ रस्त्यांवर २४ तास वाहतूक नियोजनाचे काम करत होते. या रस्ते कामामुळे शिळफाटा रस्ता पाच दिवस अभूतपूर्व वाहतूक कोंडीत अडकेल अशी भीती प्रवाशांच्या मनात निर्माण झाली होती. परंतु, कोळसेवाडी वाहतूक विभागाचे सचिन सांडभोर यांनी या रस्त्यावर हलक्या वाहनांव्यतिरिक्त अवजड एकही वाहन येणार नाही. बहुतांशी हलकी वाहने शिळफाटा पलावा चौकाकडे न येता पर्यायी रस्ते मार्गाने जातील यादृष्टीने वाहतुकीचे नियोजन केले होते.

चौकटींचा पाळणा

जमिनीवरील चौकटी ७०० टन वजनाच्या क्रेनच्या साहाय्याने अलगद उचलून पुलाच्या बोगद्यात ठेवल्या जात होत्या. क्रेनचा कर्णकर्कश आवाज, अवजड चौकट पुलासाठीच्या खोदकामाच्या चौकटीत बसविताना अभियंत्यांची कसरत मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी बघ्यांची झुंबड उडत होती. दोन दिवसांच्या कालावधीत १९ चौकटी पुलाच्या खाच्यात बसविण्यात आल्या. या चौकटीवरून रेल्वे रूळ आणि या बोगद्यातून मालवाहू डब्यांची वाहतूक होईल. या चौकटीतील मोकळी जागा भरण्याचे काम रविवारी दिवसभरात पूर्ण होईल. विहित वेळेच्या आत हे काम पूर्ण होईल, असे रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्याने सांगितले.

अतिशय शिस्तबध्द वाहतुकीचे नियोजन केल्याने निळजे रेल्वे पुलाचे आव्हानात्मक काम असताना शिळफाटा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली नाही. प्रवाशांनी वाहतूक विभागाच्या सूचनांचे पालन केले. त्यामुळे रेल्वेला विहित वेळेपेक्षा अगोदर आपले काम पूर्ण करता आले.- सचिन सांडभोर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळसेवाडी वाहतूक विभाग.

(निळजे रेल्वे पुलाच्या खाच्यात भक्कम काँक्रीट चौकटी ठेऊन पुलाची उभारणी करण्यात आली.)