ठाणे : ठाण्यातील अंतर्गत वाहतुकीला बळ मिळावे यासाठी मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरु असतानाच, मनोरुग्णालयाची अत्याधुनिक पद्धतीने पुर्नबांधणी करण्यास राज्य सरकारने अर्थसंकल्पात शिक्कामोर्तब केल्याने नवीन स्थानकासाठी आवश्यक असलेली जागा मोकळी होणार आहे. यामुळे नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला वेग येण्याची चिन्हे आहेत. याशिवाय, अंतर्गत मेट्रो आणि जलवाहतूक या सारखे कागदावर असलेल्या प्रकल्पांना राज्याच्या अर्थसंकल्पात स्थान देण्यात आल्याने हे प्रकल्पही मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची अंदाजे जागा ७२ एकर असून यातील मनोरुग्णालयाच्या ताब्यात सध्या ५३.४३ एकर इतकी जागा आहे. ८.४२ एकर जागेवर अतिक्रमण झाले आहे तर साडेपाच एकर जागा जिल्हाधिकाऱ्यांनी पाच संस्थांना दिली आहे. मनोरुग्णालयाची १४.८३ एकर इतकी जागा ठाणे आणि मुलूंड रेल्वे स्थानकादरम्यान प्रस्तावित असलेल्या नवीन रेल्वे स्थानकासाठी देण्यात येणार आहे. ठाणे मनोरुग्णालयाची जागा कुणालाही हस्तांतरित करू नये हा स्थगिती आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच मागे घेतला असुन यामुळे मनोरुग्णालयाच्या जागेवर नवीन रेल्वे स्थानक उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या जागेत मनोरुग्णालयाचे पाच वाॅर्ड असून हे वाॅर्ड दुसऱ्या जागेत हलवावे लागणार आहेत. पालिकेकडून दुसऱ्या ठिकाणी वाॅर्ड हलविण्यासाठी प्रयत्न सुरु असले तरी राज्य सरकारने आता मनोरुग्णालयाची अत्याधुनिक पद्धतीने पुर्नबांधणी करण्याचा निर्णय घेतला असून तसा उल्लेख अर्थसंकल्पात केला आहे. यामुळे पाच वाॅर्डचे बांधकाम हटवून त्याठिकाणी नवीन रेल्वे स्थानक उभारणीच्या कामाला वेग येण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा >>> कल्याण मधील बारावे कचराभूमीला भीषण आग
ठाण्यातील अंतर्गत वाहतुकीला बळ मिळावे यासाठी मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरु असली तरी अंतर्गत मेट्रो आणि जलवाहतूक या सारखे प्रकल्प गेले अनेक वर्षे कागदावर आहेत. हे प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही असून यासाठी गेल्या काही वर्षांपासून ते प्रयत्नशील आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात त्यांनी ठाण्यातील कागदावर असलेल्या अंतर्गत मेट्रो आणि जलवाहतूक या सारखा प्रकल्पांना अर्थसंकल्पात स्थान देऊन आर्थिक तरतुद केली आहे. त्यामुळे हे प्रकल्पही मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ठाणे वर्तुळाकार मेट्रो, मुंबई महानगर क्षेत्रात पारसिक हिल्स बोगदा, मीरा-भाईंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प, विविध उड्डाणपूल यावर्षी पूर्ण करणे, ठाणे-वसई खाडी जलवाहतुकीने जोडण्यासाठी ४२४ कोटींची तरतुद, स्टार्टअपसाठी कळंबोली, नवी मुंबई येथे निवासी प्रशिक्षण-संशोधन संस्था, नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क, प्रयोगशाळानिर्मित हिऱ्यांच्या उद्योगाला चालना, राज्यात १४ ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करणार असून त्यात ठाण्यातील अंबरनाथ शहराचा समावेश आहे. मानसिक अस्वास्थ आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या लक्षात घेऊन जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे, ठाणे आणि कोल्हापुरात अत्याधुनिक मनोरुग्णालये उभारण्यात येणार असून त्यासाठी ८५० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.