कल्याण – कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ पालिकेतर्फे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत वलीपीर रस्ता ते मुरबाड रस्ता दरम्यान उड्डाण पूल उभारणीचे काम सुरू आहे. या पुलावर मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेत तुळया ठेवण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. दिवसा या भागात वाहनांची वर्दळ असल्याने रात्री १२ ते सकाळी सहा वाजेपर्यंत पुलांच्या आधार खांबांवर तुळया ठेवण्याची कामे केली जात आहेत, अशी माहिती स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी दिली.
या तुळया ठेवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जात आहे. रात्री १२ वाजल्यानंतर कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील काही भागातील वाहतूक बंद ठेऊन ही कामे केली जात आहेत. आता दिलीप कपोते वाहनतळ ते जुने महात्मा फुले पोलीस ठाण्यापर्यंतच्या पुलाच्या भागावर तुळया ठेवण्याची कामे रात्रीच्या वेळेत केली जात आहेत. तुळई उचलताना ती समांंतर पध्दतीने उचलली जावी अशी यांत्रिक यंत्रणा येथे तयार करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनावरील तुळई अलगद यांत्रिक पध्दतीने उचलली जाऊन ती पुलाच्या आधार खांबांवर ठेवली जात आहे, असे कार्यकारी अभियंता लोकरे यांनी सांगितले.
दिवसा ही आव्हानात्मक कामे करणे या रस्त्यावरील वाहतुकीमुळे शक्य होत नाही. रात्रीच्या सहा तासाच्या कालावधीत शक्य तेवढ्या तुळया ठेवण्याची कामे हाती घेतली आहेत. दररोज तीन ते चार तुळया आधार खांबांवर ठेवल्या जात आहेत. वीस फूट, चाळीस फूट लांबीच्या या तुळया आहेत. लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील स्मार्ट सिटी उड्डाण पुलाच्या आधार खांबांवर तुळया बसविण्याची कामे सुरू आहेत. ही कामे दिवसाच्या वाहन वर्दळीमुळे करता येत नाहीत. त्यामुळे रात्री १२ ते सकाळी सहा या वेळेत ही कामे केली जात आहेत. रेल्वे स्थानक भागातील स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे गतिमानतेने पूर्ण करण्याचे नियोजन आहे.-रोहिणी लोकरे, कार्यकारी अभियंता, स्मार्ट सिटी प्रकल्प.