डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर मधील चोळे पाॅवर हाऊस (बंद पडलेले), खंबाळपाडा खाडी किनारा ते कल्याणमधील गोविंदवाडी या खाडी किनारा भागातील बाह्य वळण रस्ते कामाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुरूवात केली आहे. टिटवाळा-कल्याण-डोंबिवली ते शिळफाटा हेदुटणे या ३० किलोमीटर लांबीच्या रस्ते मार्गातील ठाकुर्लीतील चोळे पाॅवर हाऊस ते गोविंदवाडी हा महत्वाचा टप्पा आहे.
डोंबिवली पश्चिमेतील माणकोली पुलाजवळील मोठागाव, देवीचापाडा, गरीबाचापाडा, कुंभारखाणपाडा, गणेशनगर, चोळे पाॅवर हाऊस, खंबाळपाडा ते गोविंदवाडी, दुर्गाडी किल्ला हा सात किलोमीटर लांबीचा रस्ता उल्हास खाडी किनारा भागातून जात आहे. या रस्ते मार्गामुळे कल्याण ते डोंबिवली तिसऱ्या एका रस्ते मार्गाने जोडली जाणार आहे. यापूर्वी शिळफाटा, घरडा सर्कल, त्यानंतर, पत्रीपूल ते ९० फुटी रस्ता मार्गाने प्रवासी डोंबिवलीत येत होते. आता कल्याणमधील दुर्गाडी किल्ला, गोविंदवाडी येथून प्रवासी खाडी किनारा भागातून गणेशनगर, मोठागाव रस्त्याने डोंबिवलीत येऊ शकणार आहे. मोठागाव-दुर्गाडी रस्ते कामासाठी शासनाने दोन वर्षापूर्वी ५६१ कोटी रूपये मंजूर केले आहेत.
गणेशनगर चोळे पाॅवर हाऊस (बंद) ते गोविंदवाडी रस्ता दरम्यानच्या खाडी किनारी भागात मातीचे भराव टाकण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाच्या ठेकेदाराने सुरू केले आहे. ४५ मीटर रूंदीचा हा रस्ता आहे. पुढील वर्षापर्यंत हा रस्ते मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. गोविंदवाडी, मोठागाव डोंबिवली रस्त्यामुळे कल्याणमधील प्रवासी थेट माणकोली पुलापर्यंत येऊ शकणार आहे. डोंबिवलीतील प्रवासी या रस्त्याने थेट दुर्गाडी किल्ला भागात जाऊ शकणार आहे.
या रस्त्यामुळे डोंबिवली पश्चिमेतील बहुतांशी प्रवासी वळण रस्त्याने शहरा बाहेरून कल्याण, डोंबिवली दरम्यान प्रवास करणार आहे. त्यामुळे डोंबिवली पूर्व भागातील रस्ते, पुलांवर येणारा वाहतूक भार कमी होऊन शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. कल्याण, डोंबिवली शहराबाहेरून येणारी वाहने शहराबाहेरून निघून जावीत या दूरगामी विचारातून एमएमआरडीएच्या पुढाकाराने कल्याण डोंबिवली महापालिका टिटवाळा, कल्याण ते डोंबिवली, शिळफाटा या ३० किलोमीटर लांबीच्या वळण रस्ते मार्गाची उभारणी करत आहे.
या रस्ते मार्गातील टिटवाळा, गांधारी, वाडेघर, आधारवाडी कचराभूमीपर्यंतचे रस्ते काम पूर्ण झाले आहे. टिटवाळा ते वडवली दरम्यान अटाळी भागात सुमारे पाचशेहून अधिक बांधकाम या रस्ते मार्गाला अडथळा येत होती. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या पुढाकाराने अ साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दोन दिवसापूर्वी ही बांधकामे जमीनदोस्त केली.