डोंबिवली- डोंबिवली जवळील भोपर गावात एका विकासकाचे इमारत बांधकाम उभारणीचे काम सुरू आहे. या इमारतीला सिमेंट, विटे, अवजड सामान उंचावर वाहून नेण्यासाठी उदवहन बसविण्यात आले आहे. या कामाच्या ठिकाणी काम करत असताना विकासक, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे उदवहन एका कामगाराच्या अंगावर शनिवारी कोसळले. कामगार गंभीर जखमी झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इमारत बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराला विकासक, ठेकेदाराने सुरक्षिततेची सर्व साधने देऊन मगच त्यांना तेथे काम द्यायचे आहे. हे नियम विकासकांकडून पाळले जात नाहीत. भोपर येथे काम करणाऱ्या विकासक आणि ठेकेदार धर्मेश माउजी पटले उर्फ भावेश यांनी कामगारांना सुरक्षिततेची साधने दिली नाहीत, असा ठपका ठेवत मानपाडा पोलिसांनी विकासक भावेश विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. रामसुरेश मौर्या यांनी ही तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात केली.

हेही वाचा >>>मीरा रोड रेल्वे स्थानकात रिक्षा

उदवहन कोसळून तक्रारदार रामसुरेश यांचा नातेवाईक संदीपकुमार मौर्या (३५) गंभीर जखमी झाला आहे.पोलिसांनी सांगितले, संदीपकुमार हा भोपर येथील विकासक भावेश यांच्या व्हीनस स्काय सिटी बांधकाम कंपनीत इमारत बांधकामाच्या ठिकाणी काम करतो. नवीन बांधकामाच्या ठिकाणी अवजड सामान इमारतीवर नेण्यासाठी लोखंडी उदवहन उभे करण्यात आले आहे. साखळीच्या माध्यमातून हे उदवहन खाली वर येजा करते. या कामाच्या ठिकाणी काम करताना कामगाराला शिरस्त्राण, जॅकेट, हातमोजे अशी सामुग्री देणे ठेकेदाराचे काम आहे. अशी कोणतीही साधने संदीपकुमार यांच्याजवळ नसताना ते उदवहन जवळ काम करत होते. सामान इमारतीवर पोहचवुन उदवहन खाली येत असताना ते कोसळले आणि संदीपकुमारच्या अंगावर कोसळले. यात संदीपकुमार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा >>>कल्याणमध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल

कल्याण डोंबिवली शहराच्या विविध भागात अशाप्रकारच्या उदवहन बेकायदा इमारतींच्या ठिकाणी अनेक महिने उभ्या आहेत. पालिकेकडून या धोकादायक उदवहनवर कारवाई करण्यात येत नसल्याने परिसरातील रहिवासी आश्चर्य व्यक्त करतात.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worker seriously injured after construction materials fell in bhopar in dombivli amy