ठाणे : ठाण्यात कोणत्याही सुरक्षा साधनाविनाच महिला कामगार नाले सफाईची कामे करीत असल्याचे आणि जागोजागी कचऱ्याचे ढिग साचलेले असल्याचे चित्र सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाहणी दौऱ्याआधी वर्तकनगर भागात दिसून आले. यामुळे नाले सफाईच्या कामांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून त्याचबरोबर महिला कामगारांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत
पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची भिती असते. या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे महापालिकेने नालेसफाईची कामे हाती घेतली आहेत. यंदा उशिराने नाले सफाईची कामे सुरू झाली आहे. त्याचबरोबर शहरात रस्ते कामेही सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी म्हणजेच ३१ मे पर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदारांना देण्यात आले आहेत. ही मुदत संपण्यासाठी अवघे ८ दिवस शिल्लक राहिले आहेत. या कामांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सोमवारी दुपारी पाहणी करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून जाहीर करण्यात आले. या नियोजित दौऱ्यामध्ये वर्तकनगर भागातील भीमनगर परिसरातील नालेसफाईची पाहणी करण्यात येणार होती. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन आणि ठेकेदारांनी कामांचा वेग वाढविला होता. याठिकाणी महिला कामगार नाल्यात उतरून काठीने सफाईचे काम करीत होत्या. त्यांना हात मौजे, गमबुट आणि मुखपट्टी देण्यात आलेले नव्हते. या सुरक्षा साधनांविनाच महिला कामगार सफाईचे काम करीत असल्याचे चित्र दिसून आले. याच नाल्यात दुसऱ्या बाजूला जागोजागी कचऱ्याचे ढिग साचलेले होते आणि सफाई कामासाठी नाल्यात उतरविलेला जेसीबी गाळात अडकून उलटल्याचे दिसून आले. ठाणे महापालिका क्षेत्रात कोणत्याही सुरक्षा साहित्याविनाच कामगार नाले आणि पावसाळी पाणी वाहू नेणाऱ्या गटांसोबतच मलवाहिन्यांची सफाई करीत असल्याची बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. शहरातील नालेसफाई कामांच्या पार्श्वभूमीवर श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी महापालिकेक़डे लेखी निवदेन दिले होते. त्यानंतर हि परिस्थिती अद्यापही कायम असल्याचे चित्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाहणी दौऱ्याआधी दिसून आले.
कोणत्याही सुरक्षा साधनाविनाच महिला कामगार नाले सफाईची कामे करीत असल्याचे आणि जागोजागी कचऱ्याचे ढिग साचलेले होते. हे चित्र पाहून मुख्यमंत्री शिंदे हे संबंधितांवर कारवाईचे आदेश देतील, अशी चर्चा परिसरात सुरू होती. पण, काही कारणास्तव त्यांचा या भागाचा दौरा रद्द झाल्याने संबंधितांवरील कारवाई टळल्याची कुजबुज सुरू झाली.