प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता
विरार : जागतिक कर्करोग दिवस साजरा होत असला तरी वसई- विरार महापालिका कर्करोग निवारणाबाबत उदासीन असल्याचे समोर आले आहे. पालिकेकडे कर्करोग रुग्णांच्या उपचारांसाठी कुठल्याच सुविधा नाहीत, एवढेच नव्हे तर शहरातील कर्करोग रुग्णांची माहिती देखील पालिकेकडे उपलब्ध नाही.
एकीकडे महापालिकेच्या आरोग्य सेवा कात टाकत असताना कर्करोगाकडे मात्र पालिकेचे कोणतेही लक्ष नाही आहे. कारण शहरात कर्करोगावर उपचार करण्यासाठी कोणतेही रुग्णालय नाही. तसेच किमो थेरेपीसाठीसुद्धा कुठल्याही सुविधा खाजगी अथवा शासकीय रुग्णालयात नाहीत. यामुळे शहरातील कर्करोग रुग्णांना सध्या तपासणीसाठी मुंबईतील रुग्णालयात जावे लागते. करोनाकाळात रेल्वे सुविधा बंद असल्याने या रुग्णांची मोठी परवड झाली. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांच्या जिवाला धोका निर्माण झाला.
विरारमधील रक्ताचा कर्करोग असलेल्या एका रुग्णाने माहिती दिली की, करोनाकाळात रेल्वे बंद असल्याने त्यांना उपचारांसाठी मुंबईला जाणे शक्य नव्हते. दरम्यानच्या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने त्यांना वसई- विरारमध्ये रक्त मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. वसई- विरार महापालिकेने कर्करोग रुग्णांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध केल्या नाहीत. महापालिका कर्करोग रुग्णासाठी महिला बालकल्याणतर्फे वार्षिक आर्थिक अनुदानाची तरतूद करत आहे. पण त्याची कोणतही माहिती पालिकेकडे उपलब्ध नाही. कर्करोग चाचणी केंद्रसुद्धा पालिकेने इतक्या वर्षांत उभे केले नाही. शहरामध्ये कर्करोग बाधितांची संख्या किती याची सुद्धा माहिती पालिकेकडे उपलब्ध नाही.
अशीच काहीशी परिस्थिती मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात आहे. या महापालिकेतसुद्धा कर्करोग रुग्णासाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. पालिकेच्या महिला बाल कल्याण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मीरा-भाईंदर महानगरपालिकेने अर्थसहाय म्हणून सन २०१९ – २० मध्ये केवळ ३५ तर सन २०२०— २०२१ मध्ये केवळ ८ रुग्णांना २५ हजार रुपयांची मदत केली आहे.
एकीकडे शहराचा झपाटय़ाने विकास होत असताना आरोग्यविषयक सेवा सुविधांचा मात्र अभाव दिसत आहे. कर्करोगसारख्या जीवघेण्या आजाराचे कोणतेही उपचार मोठय़ा शहरात उपलब्ध नसणे ही मोठी शोकांतिका असल्याची खंत रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी व्यक्त केली.
सध्या तरी पालिकेकडे कर्करोगावर उपचारांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत, पण लवकरच महानगरपालिका रुग्णांना किमो थेरपी आणि काही आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत आहे.
डॉ. सुरेखा वाळके, वैद्यकीय अधिकारी, वसई-विरार महानगरपालिका