संरक्षक भिंतींअभावी गर्दुल्ल्यांचा वावर, जॉगिंग ट्रॅकही खचला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहा वर्षांपूवी येथील मोरिवली विभागात निर्मिती करण्यात आलेल्या उद्यानाची  उद्घाटनानंतर काही दिवसांतच दूर्दशा झाली आहे. ती आजही तशीच असून  पालिका प्रशासनाने याकडे पाठ फिरवल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागात कल्याण-बदलापूर रस्त्यालगत मोरिवली येथे हे उद्यान आहे. उद्घाटनानंतर आठवडाभरातच येथे बसवण्यात आलेल्या कामगार प्रतीकाची नासधूस करून तो हटविण्यात आला. सध्या उद्यानाची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाली असून येथे गवत वाढल्याने सर्प आणि इतर जनावरांचा वावर वाढला आहे.

उद्यानाच्या तिन्ही बाजूंची सुरक्षा भिंत असून नसल्यासारखी आहे. महामार्गाच्या दिशेला असलेली भिंत पूर्णपणे पडली असून तेथून गर्दुल्ले आणि टवाळखोर तरुणांचा प्रवेश होतो. येथे योगासने करण्यासाठी विशेष व्यवस्था केली होती. मात्र, तिथेही रात्रीच्या वेळी गर्दुल्ल्यांच्या वावर असतो.

दुपारच्या वेळीही अनेक गर्दुल्ले आणि भिकारी येथे झोपण्यासाठी येतात. अनेकदा योगासने करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना येथे मद्य आणि अंमली पदार्थाची पाकिटे व बाटल्या आढळतात. उद्यानाच्या जॉगिंग ट्रॅकचा बहुतांश भाग खचला असून येथे चालणेही शक्य नाही. त्यामुळे येथे वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही रोडावली आहे. पथदिवेही नादुरुस्त असल्याने सायंकाळी अंधार होताच येथील वातावरण असुरक्षित ठरते.

त्यामुळे येथे अनेकदा नागरिक येणे टाळतात. उद्यानातील स्वच्छतागृहांची अवस्थाही बिकट असून येथे जाणेही शक्य नाही. शुद्ध पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नसल्याने नागरिकांची येथे मोठी पंचाईत होते.

परिसरातील काही टवाळखोर येथील उद्यानाची नासधूस करतात आणि रात्रीच्या वेळी येथे जमून मद्यपानही करतात. अनेकदा पालिकेच्या सुरक्षा रक्षकावरही त्यांनी हल्ला केला असून त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. याबाबत पोलिसांना पत्र देण्यात आले असून गर्दुल्ले आणि टवाळखोर तरुणांचा बंदोबस्त केल्याशिवाय येथे येणाऱ्या नागरिकांत सुरक्षिततेची भावना निर्माण होणार नाही. पावसाळा संपल्यानंतर उद्यानाच्या दुरुस्तीला सुरुवात होणार असून या उद्यानाचा समावेश अमृत योजनेत करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्यानाच्या विकासासाठी चांगला निधी उपलब्ध होणार आहे.

– दीपक चव्हाण, पालिका अधिकारी.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worst condition of park in ambernath
Show comments