शासनाच्या नियमाचा फटका; नवे भाडे कुस्तीगीर संघटनेला न परवडणारे

अस्सल मातीतला खेळ म्हणून कुस्ती या क्रीडा प्रकाराकडे पाहिले जाते. कुस्ती जिवंत राहावी म्हणून कुस्तीप्रेमींकडून तसेच शासनाकडूनही हरप्रकारे प्रयत्न केले जात आहेत, परंतु शासनाने नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयाचा फटका मीरा-भाईंदरमधील कुस्तीला बसला आहे. शासनाच्या निर्णयानुसार महापालिकेने स्वीकारलेल्या धोरणामुळे मीरा-भाईंदरमधील असलेला एकमेव कुस्तीचा आखाडा बंद होण्याच्या मार्गावर आहे.

महापालिकेने बांधलेल्या विविध वास्तू स्वयंसेवी संस्थांना चालवण्यासाठी देण्यात आल्या आहेत. समाजमंदिरे, व्यायामशाळा, कुस्तीचा आखाडा आदींचा यात समावेश आहे. या वास्तूंसाठी नाममात्र भाडे पालिकेकडून आकारले जात होते, परंतु शासनाने सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या निर्णयानुसार आता या वास्तूंना चालू बाजारभावानुसार भाडे आकारले जाणार आहे. महापालिकेच्या वास्तू खासगी संस्थांना देताना त्यांच्याकडून चालू बाजारभावाइतके भाडे वसूल करावे, असे आदेश शासनाने महापलिकांना दिले आहेत. महापालिकेच्या या निर्णयामुळे या वास्तूंच्या भाडय़ात प्रचंड वाढ होणार आहे. पदरमोड करून चालवण्यात येत असलेल्या कुस्तीच्या आखाडय़ाला भाडय़ाचे हे ओझे न पेलवणारे आहे. परिणामी आखाडा बंद करण्याची वेळ संचालकांवर येऊन ठेपली आहे.

मीरा-भाईंदरमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर भारतीय समाजाची संख्या मोठी आहे. या समाजात कुस्ती हा खेळ विशेष लोकप्रिय आहे. यातीलच काही कुस्तीशौकिनांनी एकत्र येत श्री गणेश आखाडय़ाची स्थापना केली. २००२ मध्ये मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघाने आखाडय़ाची मुहूर्तमेढ रोवली. मीरा-भाईंदरमधला हा एकमेव आखाडा आहे. महापालिकेनेही आखाडय़ाला सर्व सोयीसुविधा पुरवल्या तसेच भाडेही नाममात्र इतकेच आकारले. आखाडय़ात कुस्तीचा सराव करायला येणारे मुले ही अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. उलटपक्षी आखाडय़ात आवश्यक असणारी विशिष्ट प्रकारची माती, तिची मशागत, वीज यांसाठी येणारा खर्च कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी आपल्याच खिशातून देत असतात.

आखाडा कसा सुरू ठेवायचा?

आज या आखाडय़ाने चांगला जम बसवला असून यात ६० मुले आणि १५ मुली दररोज कुस्तीचे धडे गिरवत आहेत. यातील अनेक कुस्तीगीर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी कुस्तीचा मॅटवरही सराव करणे आवश्यक आहे. या दृष्टीने मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघाने आखाडय़ात मॅट बसवले.  आज आखाडय़ातील उदयोन्मुख कुस्तीगीर मातीसह मॅटवरही सराव करत आहेत. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच आता महापालिकेने भाडेवाढीचा डावपेच आखाडय़ाला घातला आहे. लिलाव पद्धतीने हे भाडे निश्चित केले जाणार आहे. लिलावासाठी भाडय़ाची वार्षिक किमान रक्कम १ लाख ५२ हजार  प्रशासनाने निश्चित केली असून यापेक्षा सर्वाधिक भाडे देण्याची बोली लावणाऱ्या संस्थेला हा आखाडा चालवण्यासाठी देण्यात येणार आहे. भाडय़ात केलेल्या प्रचंड वाढीने कुस्तीगीर संघाचे कंबरडे मोडणार असून न परवडणाऱ्या भाडय़ात आखाडा कसा सुरू ठेवायचा, असा प्रश्न उभा राहिला आहे.

कुस्ती आखाडय़ात मोफत प्रशिक्षण दिले जाते. या ठिकाणी कोणताही व्यवसाय केला जात नाही. असे असताना आखाडय़ाला चालू बाजारभावाप्रमाणे भाडे कशासाठी?

– वसंत पाटील, सरचिटणीस, मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ