माधवी घारपुरे, लेखिका
भाषेचा उत्सव म्हणजे पुस्तक. भावनेचा ठाव घेण्याची ताकद पुस्तकांमध्ये असते. अन्य व्यक्तीचे वाचल्यावर स्वत:च्या चिंतनाचे फळ पुस्तकातून मिळते. संपूर्ण जीवनाचे स्तोत्र पुस्तकामध्ये असते. ज्ञानाचा संग्रह असलेल्या पुस्तकांच्या अलीबाबा गुहेची चावी आपल्याजवळ असायला हवी. हे वाचनाचे धन कुणीही चोरण्याचे भय नसते. यासाठी प्रत्येकाकडून पुस्तकांचे वाचन होणे गरजेचे आहे. माझा जन्म सांगली येथे झाला. आमच्या वाडय़ामध्ये गोखले आजी राहत होत्या. माझ्या लहानपणी गोखले आजी मला हाताला धरून ग्रंथालयात घेऊन जायच्या. ग्रंथालयात गेल्यावर बाल विभागात मला बसवून हवे असलेले पुस्तक वाचायला सांगायच्या. चांदोबा सारखी पुस्तके त्या वेळी माझ्या हाती लागली. वाचनाची आवड निर्माण झाली आणि गोखले आजींसोबत मी नेहमी ग्रंथालयात जाऊ लागले. माझे वडील माझ्या आईला पुस्तके वाचून दाखवत. आई वाचू शकत होती. मात्र दररोज आमच्या घरात माझे वडील माझ्या आईला काही उतारे, कथा वाचून दाखवत असल्याने आपसूकच वाचनाचे संस्कार माझ्यावर झाले. लहान वयात ‘चांदोबा’सोबत रणजित देसाईंचे ‘शेकरु’, ‘पावनखिंड’, ब. मो. पुरंदरे यांचे ‘शिलंगणाचे सोने’ अशी पुस्तके वाचली. रामदासांच्या कथा, गणपतीच्या कथांचे वाचन लहान वयात असताना झाले. लहान वयात कथा सांगण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर दिला.
महाविद्यालयात असताना प्रेमविषयक कादंबऱ्यावाचनाची आवड नव्हती. महाविद्यालयीन वयात ‘श्रीमानयोगी’, ‘स्वामी’, ‘शिवचरित्र’, ‘झुंज’, ‘झेप’ अशी पुस्तके वाचण्याकडे माझा जास्त कल होता. लहानपणापासून आजपर्यंत रहस्यमय कथा मी कधीच वाचल्या नाहीत. या साहित्यावर माझा राग आहे, असे नाही, पण पूर्वीपासून गूढ-कथावाचनामध्ये मी रमले नाही. प्राध्यापक असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मी संदर्भासाठी वाचन केले. विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त ज्ञान देण्यासाठी अवांतर वाचन केले. मी कथाकथन करत असल्यामुळे व. पु. काळेंच्या कथांचा प्रभाव माझ्यावर आहे.
कथा सादरीकरणासाठी लागणारे साधे लेखन व. पु. करत असल्याने मला त्यांच्या साहित्याचा फार उपयोग झाला. रवींद्र पिंगे यांचे ‘चिरेबंदी’, ‘केशरबन’, शं. ना. नवरे यांचे ‘शहाणी सकाळ’, ‘चिखल’, ‘सांजवेळच्या कथा’, ‘झोपाळा’, पु. ल. देशपांडे आदींची पुस्तके माझ्या संग्रही आहेत. व. पु. काळे यांच्या संपर्कात आल्याने त्यांच्या आठवणी माझ्याजवळ आहेत. एकदा मी माझी कथा व. पु. काळेंना ऐकवून दाखवली होती. त्यावर त्यांनी स्वत: माझीच कथा मला वीस ते पंचवीस मिनिटे रंगवून सांगितली होती. आवडत्या लेखकाकडून आपली कथा ऐकणे हा माझ्यासाठी वेगळा आनंद होता. ललित, आध्यात्मिक, चरित्रात्मक वाचन करते. गिरीश जखोटिया यांनी लिहिलेले ‘एका मारवाडय़ाची गोष्ट’ हे पुस्तक मला अधिक भावले.
गीता न सांगता गीतेतील अध्यात्म सांगून व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यात या अध्यात्माचा अनुभव घेत असतो, याबद्दल त्यांनी लिहिले आहे. झिम्मा, संवाद बाप लेकीचा हे नंदिनी महेश्वर यांनी संपादित केलेले पुस्तक आवडले. माझ्या संग्रहातील अनेक पुस्तके मी ग्रंथालयात, शाळेत देते. पुस्तकांची देवाणघेवाण करायला मला आवडते. याचे कारण असे की, पुस्तके कपाटात राहून त्याचे सौंदर्य वाढत नसते. एका हातातून दुसऱ्या हातात पुस्तक गेले तर पुस्तकातील ज्ञानाचा प्रसार होतो. ज्ञानतीर्थ मिळवण्यासाठी तरुणांनी ग्रंथांच्या क्षेत्री जायला हवे, असे मला वाटते. स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद यांची चरित्रे, काही शब्दकोश माझ्या संग्रही आहेत. वाचनाशिवाय उत्तम लिखाण करता येत नाही यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे पुस्तके कधीही रिता न होणारा अमृतकुंभ आहे, असे मला वाटते. लहानपणी माझ्या चुलत भावाने मला भाऊबीजेची ओवाळणी म्हणून दोन रुपयांचे ‘चांदोबा’ मासिक भेट दिले होते. ते आजही माझ्या स्मरणात आहे. गो. नी. दांडेकरांचे, ब. मो. पुरंदरेंची स्वाक्षरी असलेले पुस्तक संग्रही आहे. आपण काहीही चांगले वाचलेले नेहमी लिहून ठेवावे असे सावरकरांनी सांगितले आहे. लहानपणापासूनच चांगले काही वाचले की, मी लिहून ठेवते. माझा संग्रह असलेला अशा अनेक वह्या माझ्याजवळ आहेत. यापैकी एकही वही हरवल्यावर मी अस्वस्थ होते.

Story img Loader