चिरंजीव असली तरीही अश्वत्थामा ही महाभारतातील दुर्लक्षित व्यक्तिरेखा आहे. त्यांच्यावर कादंबरी लिहिणे हे धाडसाचे काम आहे. साधे प्रश्न सोडविणे सोपे असले तरी कठीण प्रश्न हाती घेऊन सोडविणे महत्त्वाचे असते. जे इतरांनी केले तेच तुम्ही करण्यात काही नावीन्य नाही. नावीन्यपूर्ण करण्यासाठी धाडसाची गरज असते. ते धाडस नाटककार अशोक समेळ यांनी केले आहे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
प्रेरणा कला संस्था, कोकण कला अकादमी आणि डिम्पल पब्लिकेशन यांच्या वतीने गडकरी रंगायतन येथे झालेल्या प्रकाशन सोहळ्यात दिग्दर्शक, अभिनेते असलेल्या अशोक समेळ लिखित ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या महाकादंबरीचे प्रकाशन डॉ. माशेलकर यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यास ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, कोकण कला अकादमीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, नाटय़ संमेलनाध्यक्ष फैय्याज, कला दिग्दर्शक नितीन देसाई, कवी अशोक बागवे, डिम्पल पब्लिकेशनचे अशोक मुळे, अभिनेते संग्राम समेळ आदी मान्यवर उपस्थित होते. अश्वत्थाम्यावर अतिशय अभ्यासपूर्ण, संशोधन आणि विश्लेषणात्मक पद्धतीने अशोक समेळ यांनी ही कादंबरी लिहिली आहे. या महाकादंबरीमुळे अश्वत्थाम्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळू शकेल. समेळ यांनी २१ र्वष केलेल्या मेहनतीचे कौतुक या वेळी माशेलकरांनी केले. कोणत्याही माहितीतून नवीन अन्वयार्थ काढणे महत्त्वाचे असते. जे एखाद्या व्यक्तीला दिसते, ते इतरांना दिसेलच असे नाही. प्रत्येक व्यक्तीचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. इतरांनी दुर्लक्षित ठेवलेल्या अश्वत्थाम्यास लेखक अशोक समेळ यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. असेही ते म्हणाले. नाटय़संमेलनाध्यक्षा फैयाज यांनी समेळ यांचे कौतुक करताना व्यासांनी महाभारत लिहितानाही टाळलेला अश्वत्थामा अशोक समेळ यांनी लिहिला आहे, असे मत व्यक्त केले.
‘युवाशक्तीला आकार द्या’
डॉ. माशेलकर यांनी रघुनाथ नगर येथील शारदा एज्युकेशन सोसायटी संचालित ‘आनंद विश्व गुरूकुल’ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. त्यामुळे युवाशक्तीला आकार दिल्यास देशाची प्रगती निश्चित होईल. त्यामुळे विद्यार्थी केंद्रित शिक्षणाची संकल्पना राबवण्याची गरज आहे. आनंद विश्व गुरुकुलमध्ये त्या पद्धतीची शिक्षणपद्धती राबवली जात आहे. हे आनंददायी असे आहे. सद्यकालीन शिक्षण पद्धती बदलण्याची गरज असून घोकंपट्टीवर भर देणारी शिक्षण पद्धती बदलून प्रत्यक्ष प्रयोगांवर भर देणारी, ज्ञानाचा, माहितीचा शोध घेणारी पद्धत हवी. शास्त्रीय विषयांचा अभ्यासक्रमात स्थानिक निसर्ग, माती, फुले, फळे, समाजिक व आर्थिक समस्या यांचा अंतर्भाव केलेला असावा. त्यातून अभ्यासक्रमाला वेगळे परिणाम मिळेल, असे ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा