यामफ्लाय हे फुलपाखरू ब्लूज (निळ्या) फुलपाखरांच्या गटामध्ये मोडते. या फुलपाखरांना लायकेनिडे असेही म्हटले जाते. हे लहानखुरे फुलपाखरू तसे पटकन दिसत नाही. मुळामध्ये हे फुलपाखरू जरी उत्तर भारतातील बऱ्याचशा भागात जसे की उत्तरांचलपासून अरुणाचल प्रदेश आणि मध्य भारतातही महाराष्ट्राच्या उत्तरेकडील प्रदेशामध्ये दिसत असले, तरी सह्य़ाद्रीच्या उत्तरेकडील भागात पाऊस अगदी जोरात असताना पाहावयास मिळते.
ही फुलपाखरे छोटय़ा चणीची असतात. पंख मिटून बसली की यांचा हळदीसारखा पिवळा रंग अगदी उठून दिसतो, मात्र पंख उघडले की यांचे नारिंगी रंगाचे पंख आणि त्याला असलेली काळ्या रंगाची किनार विलक्षण लोभसवाणी दिसते. याचं अजून एक वैशिष्टय़ म्हणजे मागील दोन्ही पंखांच्या टोकाला निमुळती होत जाणारी तलवारीसारखी टोकं असतात. आणि या पिवळ्या नारिंगी रंगात ती मात्र पांढऱ्या रंगांची असतात. अर्थातच भक्षकांना चकवण्यात याचा फार मोठा वाटा असतो. भक्षकांना या स्पृशा वाटतात (मिशा वाटतात) आणि फुलपाखरांचं तोंड त्या बाजूला आहे असं समजून भक्षक यामफ्लायला पकडायला जातो आणि फसतो. भरपूर पाऊस असणारे प्रदेश, बांबूची बनं, हिरव्यागार गवताने फुललेले माळ हे याचे आश्रयाचे आवडते ठिकाण.
या फुलपाखरांच्या अळ्या याम म्हणजे सुरण किंवा तत्सम कंद वर्गातील झाडांची पाने खाऊन वाढतात. म्हणून यांना यामफ्लाय हे नाव प्राप्त झाले आहे.
शिवाय इतर लायकेनिडे फुलपाखरांच्या अळ्यांसारखेच या फुलपाखरांच्या अळ्यांचे लाल मुंग्यांशी साहचर्य बघायला मिळतं. लाल मुंग्या या अळ्यांना अगदी मायेने जपतात, त्याचं संरक्षण करतात आणि त्या बदल्यात या अळ्यांच्या शरीरामधून बाहेर पडणारा गोडसर चिकट स्राव मिळवतात.
असं हे फुलपाखरू पावसाळा सुरू झाला की किंवा त्याच्या आधीसुद्धा गवतात माळावर अगदी हमखास बघायला मिळणारच.