गेला आठवडाभर ठाण्यात कला-क्रीडा महोत्सवाची लगबग सुरू आहे. यामुळे संपूर्ण ठाणे शहरात एक उत्साही वातावरण आहे. महापौर संजय भाऊराव मोरे यांच्या संकल्पनेतून व ठाणे महापालिकेच्या माध्यमातून होत असलेल्या भव्यदिव्य अशा सोहळ्यात ठाणेकर नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले आहेत. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देऊन त्यातील अस्सल कलागुण असलेला कलाकार शोधणे हा त्यामागील महत्त्वाचा उद्देश. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना विविध वाहिन्यांच्या माध्यमातून सर्वच जण पाहत असतात. मात्र कलागुण असलेले कलाकार हे व्यासपीठाअभावी मागे पडतात. केवळ अशा कलाकारांसाठी महापौरांनी राबविलेला हा महोत्सव स्तुत्य असा म्हणावा लागेल. २३ जानेवारीपासून प्रभाग समितीनिहाय सुरू झालेल्या या नृत्य, एकपात्री अभिनय, कथाकथन, रांगोळी, पाककला, लघुचित्रपट, मिस्टर, मिसेस, मिस ठाणेकर या स्पर्धाना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धाच्या प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी ही काशिनाथ घाणेकर नाटय़गृह येथे संपन्न झाली. अंतिम फेरी सुरू होण्यापूर्वी आशियाई स्पर्धेच्या धर्तीवर महापौरांच्या संकल्पनेतून भव्यदिव्य असा, डोळ्यांचे पारणे फेडणारा कार्यक्रम दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे पार पडला. खो-खो, कबड्डी, मल्लखांब, टेबल टेनिस, बॅडमिंटन आदी विविध क्रीडाप्रकारांसाठी महाराष्ट्रातून ठाण्यात दाखल झालेल्या संघांनी ध्वजसंचलन केले. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, लावणीचा ठेका, जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिके सादर करून या अंतिम फेरीची सुरुवात करण्यात आली. या महोत्सवामुळे निश्चितच ठाणेकरांना आपली कला सादर करण्याचे हक्काचे स्थान मिळालेच, शिवाय असा महोत्सव दरवर्षी आयोजित करावा अशा प्रतिक्रियाही अनेकांनी महापौर संजय मोरे यांना दिल्या. या महोत्सवानंतर ठाण्यात ठाणे फेस्टिव्हल सुरू होणार आहे, मुंबईतील काळा घोडा महोत्सवाच्या धर्तीवर हा महोत्सव गेल्या वर्षीपासून होत आहे. कळवा पारसिकनगर परिसरातील मोकळ्या जागेवर होत असलेला महोत्सव म्हणजे ठाणेकरांसाठी एक पर्वणीच आहे. नामवंत चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन, शिल्पकला, दिग्गज कलाकारांचे गायनाचे कार्यक्रम असा भरगच्च महोत्सव कला-क्रीडा महोत्सवानंतर ठाणेकरांना अनुभवायला मिळणार आहे. हा फेस्टिव्हल संपल्यानंतर लगेचच अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे बिगुल वाजणार आहे. या निमित्ताने ठाण्यात नाटय़कर्मीची उपस्थिती, गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव स्टेडियम, डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह आदी ठिकाणी विविधांगी कार्यक्रम ठाणेकर अनुभवणार आहेत. या नाटय़ संमेलनाची तयारीही सध्या जोरदार सुरू आहे. प्रत्येक जण आपला वेळ त्यासाठी देत आहेत. नाटय़ संमेलन हा जणू सोहळा ठाण्यात होत आहे, हा सोहळा भव्यदिव्य व्हावा यासाठी शिस्तबद्ध नियोजन, आढावा बैठका घेणे गरजेचे आहे. कोणतेही संमेलन किंवा सोहळा हा यशस्वी करायचा असेल तर त्यामागे हजारो हात असावे लागतात. या संमेलनामुळे पडद्याआड गेलेली ठाण्यातील नाटय़ शाखा पुन्हा पडद्यापुढे येऊ लागली आहे. या संमेलनात तरुणांना सामावून घेण्याची गरज आहे; किंबहुना या तरुणांना भविष्यात ठाण्यातील नाटय़ शाखेच्या कार्यकारिणीवर घेण्याची आवश्यकता आहे, तर आणि तरच ही शाखा पडद्यासमोर राहील. ठाण्यात अनेक कलावंत आहेत, नाटय़कर्मी आहेत, त्याचबरोबर नवोदितांना संधी देणे हीसुद्धा काळाची गरज निर्माण झाली आहे.
नववर्षांच्या सुरुवातीलाच ठाण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे, कोणताही महोत्सव हा दीर्घकाळ ठाणेकरांच्या लक्षात राहावा यासाठी त्या कार्यक्रमाची ज्योतही तेवत राहणे गरजेचे आहे. नाटय़ संमेलन जरी तीन दिवसांचे असले तरी ठाण्यात मात्र नाटय़ शाखेच्या वतीने विविध कार्यक्रम होत राहतील. त्यानिमित्ताने ठाण्यातील हे संमेलन वर्षभर का होईना ठाणेकरांच्या लक्षात राहील यात शंका नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा