ठाणे : पर्यावरणीयदृष्ट्या अंत्यत संवेदनशील असलेल्या येऊरच्या जंगल परिसरात मागील काही महिन्यांपासून बंद असलेला धांगडधिंगा पुन्हा एकदा सुरू झाला आहे. विवाह समारंभ आणि पार्ट्यांचे आयोजन येऊरमध्ये होऊ लागले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश असतानाही रात्री-अपरात्री हाॅटेल आणि ढाब्यांवर सुरू असलेल्या पार्ट्यांमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. दोनच दिवसांपूर्वी सुमारे ११ वाजताच्या सुमारास विवाह समारंभासाठी आलेली वाहने रस्त्यालगत उभी राहिलेल्याने येऊरमध्ये कोंडी झाली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या काही ग्रामस्थांनी ही वाहने फोडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येऊरचा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असल्यामुळे येथील जंगलाचा भाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील आणि शांतता क्षेत्र आहे. येऊरमध्ये बिबट्यांसह इतर वन्यजीव आणि निशाचर प्राणी-पक्षी आहेत. मागील काही वर्षांमध्ये या भागात मोठ्याप्रमाणात ढाबे, बंगले, टर्फ, विवाह समारंभ लाॅन तयार करण्यात आले आहेत. या बांधकामांमुळे मुंबई, ठाणे तसेच विविध भागातून येऊर बाहेरील नागरिक रात्रीच्या वेळेत पार्ट्यांसाठी येतात. रात्रीच्या वेळेत अनेकदा काही आस्थापनांमध्ये मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक वाजविले जातात. त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी येऊरचे प्रवेशद्वार सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद असेल. अत्यावश्यक सेवेतील वाहने, ग्रामस्थ आणि वनविभाग किंवा वायू दलाच्या वाहनांनाच रात्री परवानगी देण्यात आली होती. शिवाय दोन हाॅटेल मालकांनी उच्च न्याालयातून परवानगी मिळविल्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.

हेही वाचा – ठाकरे गट मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सक्रिय

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असूनही नियमांचे उल्लंघन होत असल्याने सुमारे दोन वर्षांपूर्वी येथील रहिवाशांनी आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी या प्रकाराविरोधात आवाज उठविला होता. त्यानंतर तत्त्कालीन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रकरणावरून वन विभाग, पोलीस आणि ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही महिने पोलीस आणि वन विभागाने नियमांचे पालन करत सूर्यास्तानंतर प्रवेशद्वार बंद केले जात होते. परंतु मागील काही महिन्यांपासून या निमयांचे उल्लंघन होण्यास सुरुवात झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी एका विवाह समारंभासाठी येऊरमध्ये बाहेरून मोठ्याप्रमाणात वाहने आली होती. येऊरमधील रस्ते अरुंद असतानाही रस्त्यालगत ही वाहने उभी केली होती. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. या त्रासाला कंटाळून काही रहिवाशांनी रस्त्यालगत दुतर्फा उभी केलेली वाहने फोडली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पार्ट्यांकडे प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे का असा प्रश्चही विचारला जात आहे.

येऊरमध्ये पूर्वीप्रमाणे पार्ट्या सुरू झाल्या आहेत. बाहेरून येणारे नागरिक रस्त्याकडेला वाहने उभी करतात. तसेच काही आस्थापनांमध्ये ध्वनीक्षेपकही वाजविले जात आहेत. ग्रामस्थ यामुळे हैराण झाले आहेत. – विकास बर्वे, ग्रामस्थ, येऊर.

हेही वाचा – विधानसभा निवडणूक निकालानंतर ठाण्यातील भाजप नेते लागले कामाला, माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतल्या विभागवार बैठका

मुंबई उच्च न्यायालयाच्या निमयांचे पालन करू सूर्यास्तानंतर प्रवेशद्वार बंद केले जात आहे. तसेच रात्रीच्या वेळेत परवानगी असलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणालाही परवानगी दिली जात नाही. – मयुर सुरवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी, येऊर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yeoor jungle environment problem wedding ceremony party organizing ssb