Yoga is like music. The rhythm of a body, the melody of the mind and the harmony of the soul creates the symphony of the life. – Bks Ayyangar.
अय्यंगार यांच्यासारख्या ख्यातनाम योगमहर्षीनी मानवी जीवनातील योगाचे महत्त्व किती सार्थपणे व्यक्त केले आहे. योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. योगाचे हे महत्त्व लक्षात घेऊनच २१ जून हा सर्वात मोठा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवले. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाविषयी ११ डिसें. २०१४ रोजी रीतसर घोषणा करण्यात आली. त्यामुळे २१ जून या दिवसाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
आपल्या ठाणे शहरातही विविध शाळांमधून योग दिन मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात आला. २१ जून रोजी झालेल्या या कार्यक्रमात शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी काही शाळांमधून संस्थेचे सदस्य, पदाधिकारी ही सहभागी झाले होते.
मोहाच्या या निद्रेमधुनी
जन जन अवघे उठवू या
योगाच्या नित्य अभ्यासाने
जीवन आपुले फुलवूया
डॉ. बेडेकर विद्यामंदिर (प्राथमिक विभाग) इ. १ ली ते इ. ४ थीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला. कार्यक्रमाचा प्रारंभ वरील गीताने करण्यात आला. विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेत योगासनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. त्यानंतर मग विद्यार्थ्यांकडून शिथिलीकरण, योगमुद्रा, सूर्यनमस्कार, प्राणायाम इ. प्रात्यक्षिके करून घेण्यात आली. विद्यार्थ्यांकडून योगगीत म्हणून घेण्यात आले. शेवटी ओंकार व विश्वप्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
डॉ. बेडेकर विद्यामंदिर माध्यमिक विभागातील सकाळच्या सत्रात ६० विद्यार्थी आणि १२ शिक्षक योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. घंटाळी मित्र मंडळातर्फे आलेल्या तज्ज्ञांनी संस्थेतर्फे आलेल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासनांची प्रात्यक्षिके करण्यात आली. दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित योगदिनाच्या कार्यक्रमात शाळेचे ६० विद्यार्थी आणि ४ शिक्षक सहभागी झाले होते.
सरस्वती मंदिर प्राथमिक शाळेमध्येदेखील योगदिनाच्या कार्यक्रमात इ. ३ री आणि ४ थीचे १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रार्थनेने या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर मुलांना समजेल अशा पद्धतीने आसनांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. त्यानंतर मग विद्यार्थ्यांनी शांती मंत्र सामूहिकरीत्या म्हटल्यावर मग विद्यार्थ्यांच्या मुक्त हालचाली, प्राणायाम असे टप्प्याटप्प्याने घेण्यात आले. त्यानंतर मग अनुलोम-विलोम, ताडासन, वृक्षासन, भ्रामरी इ. आसने घेण्यात आली. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढावी म्हणून छोटासा खेळही घेण्यात आला. शांतिपाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सरस्वती सेकंडरी स्कूलच्या माध्यमिक मंडळाच्यातज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वत: योगासने केली. (इ. ८ वी) नंतरच्या ८-३० ते ९-३० च्या सत्रातील विद्यार्थ्यांनी विवेकानंद केंद्रातर्फे मार्गदर्शन करण्यात आले. इ. ७ वीच्या विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने सादर केली. दुपारच्या अधिवेशनात इ. ८ वी आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांना योगशिक्षक सुहास पाटील यांनी योग आणि योगासनांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. स्टेडियमवरील कार्यक्रमात शाळेचे ५५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
सौ. ए. के. जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील गार्गी सभागृहात इ. ७ वीच्या १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहयोग मंदिर घंटाळी येथील योगशिक्षिका सौ. सुजाताताई भिडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रात्यक्षिके करून विद्यार्थ्यांकडून विविध प्राणायाम व आसने करून घेतली. कार्यक्रमाचा प्रारंभ प्रार्थनेने झाला. त्यानंतर शरीर शिथिलीकरणाचे व्यायाम प्रकार देऊन प्राणायाम केले व नंतर नमनमुद्रा, वज्रासन, मार्जरासन इ. विविध आसनेही विद्यार्थ्यांनी केली. शाळेत शारीरिक शिक्षणाच्या तासिकांमध्ये इतर विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घालून योगदिन साजरा केला. विद्यार्थ्यांबरोबर शाळेतील शिक्षकांनीदेखील प्राणायाम व योगासने केली हे विशेषत्वाने नमूद करण्याजोगे आहे.
झवेरी ठाणावाला कर्णबधिर विद्यालयात इनरव्हील क्लब ऑफ ठाणेच्या सौजन्याने योगदिन साजरा करण्यात आला. शारदा खर्चे या योगशिक्षिकेने योगासनांविषयी मार्गदर्शन केले. शाळेचे ६० विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापिका सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रारंभी योगासनांचे महत्त्व, त्याचे फायदे आणि मग सर्व उपस्थितांनी योगासने केली.
डोंबिवली येथील पाटकर विद्यालयातही योगदिनाचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. २१ जून रोजीच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी २ दिवस आसने करण्याचा सराव केला होता. ३१ जून रोजी सकाळी ८ ते ९ मध्ये झालेल्या कार्यक्रमात इ. ५ वी ते १० वीमधील निवडक १५० मुले सहभागी झाली होती. या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा विद्यार्थ्यांनीच पूर्णपणे सांभाळली. (प्रार्थना, निवेदन, गटागटाने प्रत्येकआसनांचे प्रात्यक्षिक इतर विद्यार्थ्यांसाठी सादर करणे) हे आवर्जून नमूद करण्याजोगे!
अंबरनाथ (पूर्व) येथील बाळवाडी भगिनी मंडळाची प्राथमिक शाळा क्र. १ आणि श्रीमती सुहासिनी अधिकारी माध्यमिक विद्यालयातही दोन सत्रात योगदिन साजरा करण्यात आला आणि त्यात शाळेचे ९०० विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. शाळेची माजी विद्यार्थिनी योगशिक्षिका गीतांजली गायकर हिने सर्व उपस्थितांना विविध आसनांची प्रात्यक्षिके करण्याबाबत मार्गदर्शन केले. प्रार्थनेने सत्राचा प्रारंभ झाला, त्यानंतर योगासनांचे महत्त्व थोडक्यात विद्यार्थ्यांना सांगण्यात आले, त्यानंतर सामूहिक योगासनांची प्रात्यक्षिके आणि ओंकाराने सांगता करण्यात आली.
५ हजार वर्षांची परंपरा असलेले योगशास्त्र आज देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले आहे. योगदिनाच्या माध्यमातून आज प्रत्येक जण योग जाणून घेण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करू पाहात आहे. हा मोठा बदल आहे आणि तो नक्कीच उत्साहवर्धक आणि स्वागतार्हच आहे.