किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : पावसाळय़ात धरणातून प्रवास करावा लागत असल्याने आणि अनेक वेळा नौका उपलब्ध होत नसल्याने एका विद्यार्थीनीला शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. परंतु अशी वेळ आपल्या पाडय़ातील अन्य विद्यार्थ्यांवर येऊ नये म्हणून तिने नौकेचे सारथ्य करत विद्यार्थ्यांचा धरणातून प्रवास सुकर केला. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ती हे काम तितक्याच उत्साहात करीत आहे. ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी भागातील पलाटपाडय़ातील या प्रकारामुळे असून यामुळे शासकीय यंत्रणेचीही अनास्था समोर आली आहे.

हेही वाचा >>> रिक्षा सोबतचा फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा? माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली खात्री!

भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी भागातील पलाटपाडा – उसगाव दरम्यान एक कच्चा रस्ता आहे. पण, पावसाळय़ात कच्च्या रस्त्यावर चिखल जमा होऊन तो वाहतूकीसाठी बंद होतो. त्यामुळे पाडय़ातून अन्य भागात जाण्यासाठी उसगाव धरणातून (बंधारा) प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांचाही हाच उसगाव शाळेपर्यंत जाण्याचा मार्ग. मात्र पुरेशा नौका नसल्यामुळे त्यांना शाळेत जाणे शक्य होत नाही. यामुळे कांता बरफ विद्यार्थीनीला चार ते पाच वर्षांपूर्वी शाळा सोडावी लागली. त्यानंतर अशी वेळ आपल्या पाडय़ातील इतर विद्यार्थ्यांवर येऊ नये म्हणून तिने निर्धाराने नौकेचे सारथ्य हाती घेत विद्यार्थ्यांचा धरणातील प्रवास सुकर केला. ती रोज पाडय़ातील सुमारे ३० मुलांना नौकेतून धरणाच्या पैरतीरावर घेऊन जाते. तिचा हा प्रवास अनोखा असला तरी शासकीय अनास्थेचेही दर्शन घडवते.

चिखलामुळे मार्ग बंद..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील आहेत. याच जिल्ह्यातील गणेशपुरी येथील उसगाव भागात धरण आहे. धरणाच्या पलिकडे सुमारे ८० ते १०० घरांचा पलाटपाडा आहे. पाडय़ातील नागरिकांसाठी उसगाव, गणेशपुरी हे मुख्य बाजारपेठ. येथील विद्यार्थीही पाडय़ात अंगणवाडी आणि शाळा नसल्याने गणेशपुरी – उसगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणासाठी जात असतात. या धरणाला वळसा घालून एक कच्चा रस्ता आहे. त्या मार्गाने येथील नागरिक बाजारपेठेत जातात. परंतु पावसाळय़ात हा रस्त्यावर चिखल साचत असल्याने तो वाहतूकीसाठी बंद होतो.

रुग्णांचे हाल..

८० ते १०० घरांच्या पलाटपाडय़ातील नागरिक पावसाळय़ात आजारी पडल्यास त्यांना नौकेतून धरण पार करत रुग्णालयात न्यावे लागते. त्यामुळे वेळेत उपचार मिळाले नाहीतर जीव गमवावा लागण्याची शक्यता असल्याचे पाडय़ातील नागरिकांचे म्हणणे आहे.

Story img Loader