ठाणे : भिवंडीत शनिवारी एका १७ वर्षीय युवतीने परिसरातील एका ११ वर्षीय मुलाचे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला.  शांतीनगर पोलिसांनी युवतीला ताब्यात घेतले. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या आईचा शिवणकामाचा व्यवसाय आहे. त्यामुळे युवतीचे मुलाच्या आईकडे वारंवार ये-जा होती. परिस्थिती गरीब असल्याने हे अपहरण तिने केल्याची कबुली पोलिसांकडे दिली.

युवतीने ११ वर्षीय मुलगा शनिवारी सकाळी शिकवणी वर्गात जात असताना त्याचे अपहरण केले. त्यानंतर तिने अपहृत मुलीच्या आईला दूरध्वनीवरून सहा लाख रुपयांची खंडणी मागितली. याबाबत मुलाच्या आईने शांतीनगर पोलिसांत तक्रार नोंदवली. आरोपी युवतीचा खंडणीच्या रकमेसाठी मुलाच्या आईला पुन्हा दूरध्वनी आला, त्या वेळी शिवाजी चौक भागात रक्कम घेऊन येण्यास तिने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचला आणि त्या युवतीला पैसे देण्यासाठी मुलाच्या आईला पाठविले. त्याचदरम्यान, अपहृत मुलगा निजामपुरा येथे पोलिसांना सापडला. हा मुलगा सापडल्याचे त्या युवतीला माहित नव्हते. त्यामुळे तिने फोन करून पैसे एका दुचाकीवर ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे मुलाच्या आईने पैसे ठेवले आणि काही अंतरावर उभी राहिली. त्याचवेळी पैसे घेण्यासाठी युवती आली असता पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. बुरखा घातलेल्या महिलेने अपहरण केले होते, मात्र, तिचा हात झटकून तिथून पळ काढल्याची माहिती मुलाने त्याच्या आईला दिली. याविषयीची माहिती युवतीला नव्हती, असे पोलिसांनी सांगितले.

अन्य मोबाइलवरून संपर्क

युवतीकडे स्वत:चा मोबाईल नसल्याने ती रस्त्यावरून चालणाऱ्या कोणत्याही व्यक्तींकडून मोबाईल मागून फोन करत असे. तीन वेळा तिने मुलाच्या आईला अशापद्धतीने फोन केला होता. त्यामुळे पोलिसांना तिचा शोध लागणे अवघड बनले होते.

Story img Loader