कल्याण : भटक्या कुत्र्यांना खायला देऊ नको. ती कुत्री खूप त्रास देतात, असे धमकावून कल्याणमधील टावरी पाडा भागातील एका तरुणाने याच भागातील एका २२ वर्षाच्या तरुणीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या तरुणीच्या तक्रारीवरुन खडकपाडा पोलिसांनी तरुणाविरुध्द जीवे मारण्याची धमकी तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले, कल्याण पश्चिमेतील टावरीपाडा भागात युक्ता उपाध्याय ही तरुणी राहते. ती महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. रात्रीच्या वेळी ती नियमितपणे राहत्या घराबाहेरील भटक्या कुत्र्यांना अन्न खायाला देते. गुरुवारी रात्री अकरा वाजता युक्ता खाद्यान्न सोबत घेऊन सोसायटी बाहेरील भटक्या कुत्र्यांजवळ गेली. खाण्यासाठी भटकी कुत्री जमा झाली.
तेवढ्यात टावरीपाडा भागात राहत असलेला प्रमोद नावाचा रहिवासी स्कूटरवरुन त्या भागातून जात होता. त्यावेळी युक्ता कुत्र्यांना खाऊ घालत होती. तेथे थांबून ‘तू येथे कुत्र्यांना खाऊ घालू नको. दूरवर जाऊन ते त्यांना देत जा. कुत्री खूप त्रास देतात’, असे प्रमोद बोलत असताना कुत्री खाण्यासाठी एकमेकांच्या अंगावर जाऊन रागाने भुंकू लागली. त्यामधील एका कुत्रा प्रमोद यांच्या पायाला चावला. त्याचा राग प्रमोद यांना आला. त्यांनी तीन किलो वजनाचा दगड उचलून तो कुत्र्यांच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी युक्ताने त्यांना रोखले. त्याचा राग येऊन प्रमोद यांनी युक्ताला अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन तो दगड युक्ताच्या पायाच्या दिशेने फेकला. युक्ताच्या पायाला दुखापत झाली.
हेही वाचा : कल्याणमध्ये दहशत पसरविणारा गुंड येरवडा कारागृहात स्थानबध्द
हेही वाचा : कल्याणमध्ये चार रिक्षाचालकांची एका रिक्षाचालकाला मारहाण, भाडे कमी घेतल्याचा राग
प्रमोदकडून आपणास मारहाण होईल या भीतीने युक्ता घटनास्थळावरुन धावत सुटली. तिने रस्त्यावरुन चाललेल्या एका दुचाकी स्वाराला थांबवून त्यांच्याकडे मदतीची मागणी केली. दुचाकीवरील दोन जणांनी युक्ताच्या आईला घटनास्थळावर बोलावून घेतले. आई घटनास्थळी येताच प्रमोद यांनी पु्न्हा आई बरोबर वाद घातला. प्रमोद सामंजस्याच्या भूमिकेत नसल्याने युक्ता उपाध्याय हिने खडकपाडा पोलीस ठाण्यात येऊन त्याच्या विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी प्रमोद विरुध्द मारहाण, जीवे मारण्याची धमकी, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.