कल्याणातील यंग इंडिया संस्थेचा सामाजिक उपक्रम
कल्याणातील यंग इंडिया संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शहापूर तालुक्यातील वनवासी पाडय़ांना भेट देत दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला. या पाडय़ातील वनवासी बांधवांना विविध भेटवस्तू देत, लहान मुलांबरोबर फटाके फोडत सामाजिक संदेश देण्यात आला.
शहापूर तालुक्यातील टोकरखांड आणि उंबरवाडी या आदिवासी पाडय़ांवर गुरुवार १२ नोव्हेंबर रोजी कल्याणातील यंग इंडिया संस्थेच्या वतीने भेट देण्यात आली. टोकरखांड पाडय़ावर १३५ आणि त्यालगत असलेल्या उंबरवाडी पाडय़ावर वनवासी बांधवांची १० घरे आहेत. या सर्व घरांमध्ये ‘म ठाकूर’ या जमातीचे व १२ वेगवेगळ्या आडनावांचे वनवासी बांधव राहतात. पाडय़ातील सर्व वनवासी बांधवांचे उपजीविकेचे साधन म्हणजे भातशेती. त्याव्यतिरिक्त गावात दुसरा कुठलाही जोडधंदा नाही. गावात दुभत्या जनावरांची संख्याही नगण्यच आहे. पाडय़ातील काही आदिवासी बांधवांना उपजीविकेसाठी कसारा, वाशाळा अशा ठिकाणी मोलमजुरी करण्यासाठी जावे लागते. गावात शाळा पाचवी इयत्तेपर्यंतच आहे. पुढच्या शिक्षणासाठी अनेक किमी लांब असलेले कसारा किंवा वाशाळा गाव त्यांना गाठावे लागते.
रुग्णालय, दवाखाना अशा सुविधाही कसाराव्यतिरिक्त अन्य गावात नाहीत. वनवासी कल्याण आश्रमाच्या आरोग्य रक्षकांकडून नियमित येणारी औषधे हाच त्यांच्यासाठी मोठा आधार आहे. गावात मुख्य वस्तीच्या ठिकाणी पाण्याचा अभाव आहे. गावाबाहेर साधारण सुमारे नऊशे मीटर अंतरावर एक बंधारा बांधला आहे. त्याच्या खालच्या बाजूला एक मोठी विहीर आहे. तेथून पाणी आणावे लागते.
यंग इंडिया संस्थेच्या वतीने या वेळी पाडय़ातील १४५ घरांमध्ये दिवाळीचा फराळ म्हणून शेव, चिवडा, चकली व लाडू आणि भाऊबीज भेट म्हणून कपडे व लहान मुलांसाठी शैक्षणिक साहित्यांचेही वाटप करण्यात आले. लहान मुलांबरोबर शोभेचे फटाके या वेळी उडविण्यात आले. वनवासी कल्याण आश्रमाचे तालुका प्रमुख व गावचे आरोग्यरक्षक देवराम आवटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उपक्रमात संस्थेच्या ३९ सदस्यांनी आपला सहभाग नोंदवला. उपक्रमासाठी वनवासी कल्याण आश्रमाची मदत झाली, असे यंग इंडिया संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

Story img Loader