लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : डोंबिवली मोठागाव जवळील माणकोली पुलावर मित्रांसमवेत चित्रफित (रील) बनविल्यावर एका तरुणाने शुक्रवारी दुपारी अतिउत्साहाने माणकोली पुलावरून थेट खाडीत उडी मारली. या घटनेने खाडी परिसरात फिरण्यासाठी आलेल्या मित्र, नागरिकांनी ओरडा करून तरुणाच्या बचावासाठी प्रयत्न केले. परंतु, तरुण काही वेळाने खाडीत दिसेनासा झाला. ही माहिती विष्णुनगर पोलीस, कल्याण डोंबिवली पालिका अग्निशमन विभागाला कळताच, त्यांनी तातडीने मोठागाव खाडी किनारी येऊन बेपत्ता तरुणाचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की संबंधित तरूणाचे नाव रोहित अशोक मोर्या आहे. तो २५ वर्षाचा आहे. तो भिवंडीमधील साईनगर मधील कामतघर येथील साई मंदिर परिसरात राहत होता. रोहित दुपारी आपल्या मित्रांसमवेत शुक्रवारी दुपारी नव्याने उभारण्यात आलेल्या माणकोली पूल येथे चित्रफित तयार करण्यासाठी आला होता. मित्रांसमवेत चित्रफित काढून झाल्यावर रोहितने मित्रांना काही कळण्याच्या आत माणकोली पुलाच्या कठड्यावरून खाडीत उडी मारली.
आणखी वाचा-मनसेचे फटाके, भाजपा आमदारासाठी फोडले; कल्याणमध्ये कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहाची फजिती
रोहित कोणत्याही प्रकारच्या वादात नव्हता. त्याच्या बरोबर कोणाचा वाद नव्हता. किंवा तो तणावाखाली नव्हता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले. तरीही त्याने हे कृत्य का केले याबाबत मित्र संभ्रमात आहेत. विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून तपास सुरू केला आहे. माणकोली पुलावर डोंबिवली, भिवंडी ग्रामीण भागातील नागरिक दररोज सकाळ, संध्याकाळ फिरण्यासाठी येत आहेत. या पुलावरून नागरिकांनी स्वतःहून वाहतूक सुरू केली आहे. राजकीय गोंधळामुळे या पुलाचे काम रखडल्याची चर्चा आहे.