लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली- येथील एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एका १८ वर्षाच्या तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. लैंगिक संबंध ठेवले नाहीत तर तुझी अश्लिल अवस्थेमधील छायाचित्रे तुझ्या आई-वडिलांना दाखविन, अशी धमकी तरुण पीडितेला देत होता. या तरुणाचा त्रास वाढू लागल्याने पीडितेच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार केली.
पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार कायद्याने तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत लैंगिक अत्याचार तरुणाने पीडितेवर केले आहेत. हिमांशु राजु बामणे (१८) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तो पेंडसेनगर मधील नेहरु मैदानजवळ राहतो.
आणखी वाचा-कसारा येथे तरुण -तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
पोलिसांनी सांगितले, पीडितेच्या मैत्रिणीच्या माध्यमातून हिमांशु आणि पीडित मुलगी यांची ओळख झाली. या ओळखीतून हिमांशु पीडितेबरोबर मोबाईलवरुन संपर्क साधत होता. त्यांचे नियमित बोलणे, बाहेर फिरणे सुरू झाले होते. डिसेंबर २०२२ मध्ये हिमांशुने पीडितेला स्वतःच्या घरी बोलावून घेतले. पीडिते बरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच दिवशी त्याने पीडितेच्या इच्छेविरुध्द तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर हा प्रकार जानेवारी २०२३ पर्यंत हिमांशुने पीडितेबरोबर करत होता.
हिमांशुची वर्तवणूक चांगली नसल्याचे त्याच्या नातेवाईकाने पीडितेला सांगितले. त्यानंतर पीडितेने हिमांशु बरोबरचे बोलणे बंद केले. तरीही तो जबरदस्तीने मोबाईलवर संपर्क साधून पीडितेला घरी येण्यास जबरदस्ती करत होता. ‘तु माझ्याशी संबंध ठेवले नाहीस तर, तुझी माझ्याकडे असलेले सर्व अश्लील छायाचित्रे मी तुझ्या पालकांना दाखवेन,’ अशी धमकी आरोपी पीडितेला देत होता. हा प्रकार पीडितेने घरात आईला सांगितला. तिने मुलीचा मोबाईल काढून घेतला. मुलाच्या आईला संपर्क करुन त्याला समज देण्याची मागणी केली. तरीही आरोपी पीडितेच्या मैत्रिणींच्या मोबाईलवरुन पीडितेशी संपर्क साधत होता. तिच्या शाळा, खासगी शिकवणी वर्गाबाहेर जाऊन उभा राहून तिला संबंध ठेवण्यास भाग पाडत होता.
आणखी वाचा-कळवा रुग्णालयाऐवजी जितो संस्थेला अधिक महत्त्व, मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा आरोप
जूनपासून पीडिता पुन्हा मोबाईल वापरु लागली. मुलीला येणाऱ्या संपर्कावर आईची नजर होती. तरीही आईच्या समक्ष आरोपी मुलीला आपल्याला बोलण्यास मुभा देण्याची, संबंध ठेवण्याची मागणी करत होता. पीडितेच्या आईने हिमांशुच्या आईला सुरू असलेला प्रकार सांगितला. त्याला समज देण्याची मागणी केली. आरोपीच्या आईने पीडितेच्या आईला यापुढे हिमांशुकडून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, अशी हमी दिली. तरीही आरोपी पीडितेला संपर्क करुन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करत होता. हा त्रास वाढू लागल्याने पीडितेच्या आईने तरुणाविरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार केली.