लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : सिगारेटसाठी पैसे दिले नाही म्हणून एका तरूणावर वस्ताऱ्याने हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वागळे इस्टेट येथील अंबिकानगर भागात ही घटना घडली असून याप्रकरणी राहुल भालेराव याच्याविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबिकानगर येथील एका केशकर्तनालय दुकानात २३ वर्षीय तरुण कामाला आहे. या दुकानात राहुल भालेराव नेहमी येतो. शुक्रवारी सायंकाळी राहुल भालेराव दुकानात आला. त्याने त्या तरुणाकडे सिगारेटसाठी पैसे मागितले. तरूणाने पैसे देण्यास नकार दिला असता, राहुलने त्याला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. हा प्रकार पाहून दुकानात काम करणाऱ्या इतर दोघांनी त्याला शिवीगाळ करू नकोस असे समजावले. परंतु राहुलने शिवीगाळ करणे सुरूच ठेवले. त्यामुळे वाद वाढला आणि त्यानंतर राहुलने दुकानातील टेबलावर ठेवलेला वस्ताऱ्याने तरूणाच्या हातावर वार केला.

आणखी वाचा-ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईकर कोंडीत अडकणार

रक्तस्त्राव झाल्याने तरूणाने आरडाओरड करण्यास सुरूवात केली. या घटनेमुळे दुकानाबाहेर बघ्यांची गर्दी झाली होती. त्यांच्या दिशेने देखील राहुलने वस्तारा दाखवत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. परिसरातील नागरिक घाबरून पळू लागले. त्यानंतर राहुलने त्याठिकाणी वस्तारा फेकून दिला आणि तेथून तो पसार झाला. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young man was attacked with a knife for not paying for cigarettes mrj