लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: येथील पश्चिमेतील बेतुरकरपाडा भागातील एका १७ वर्षाच्या युवकाला इन्स्टाग्रामवरील देवेते विषयीच्या आक्षेपार्ह भाष्यावरुन २० ते २५ जणांच्या तरुणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या तरुणाच्या अंगावरील कपडे फाडून त्याची परिसरात धिंड काढून ती छायाचित्रे समाज माध्यमावर प्रसारित केली. युवकाच्या तक्रारीवरुन खडकपाडा पोलिसांनी आरोपी तरुणांविरुध्द खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहीत सुनील गायकवाड असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो खडकपाडा येथील एका दुकानात केक वितरक म्हणून काम करतो. तो बेतुरकरपाडा येथे आपल्या कुटुंबीयांसमवेत राहतो. पोलिसांनी सांगितले, बुधवारी रात्री मोहीत याच्या इन्स्टाग्रामवर आग्री-कोळी उपयोजन वापरकर्त्याने कार्ला गड येथील बौध्द पौर्णिमेची प्रार्थना आणि आई एकविरा देवीच्या उत्सवाची छायाचित्रे पाठविली होती. या छायाचित्रांच्या खाली काही आक्षेपार्ह मजकुर लिहिण्यात आला होता. मोहीतने ही छायाचित्रे पाठविणाऱ्या वापरकर्त्याला आक्षेपार्ह मजकुर तातडीने काढून टाकण्याची सूचना केली. पाठविणाऱ्याने त्यास नकार दिला. यावरुन मोहीत आणि पाठविणाऱा यांच्यात वाद झाला.
आणखी वाचा-कल्याणमध्ये आठ लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरीला
इन्स्टाग्राम खातेधारकाने मोहीताला संदेश पाठवून आक्षेपार्ह भाष्य काढून टाकण्याची सूचना केली. आणि एकविरा देवीची माफी मागण्यास सांगितले. माफीची ध्वनीदृश्यचित्रफित समाज माध्यमावर प्रसारित करण्यास सांगितले. मोहीतने त्याकडे दुर्लक्ष केले.
शुक्रवारी दुपारी मोहीत काम करत असलेल्या कामाच्या ठिकाणी पाच जण येऊन त्याला पाहून गेले. थोड्या वेळाने तेथे २५ तरुणांचा जमाव आला. त्यांनी मोहीतला दुकानातून बाहेर बोलावून एकविरा देवीची माफी मागण्यास सांगून त्याची दृश्यचित्रफित बनवली आणि प्रसारित केली. जमाव तेथून निघून गेला. मोहीतला जमावाने अटाळी, वडवली भागातील निर्जन ठिकाणी बोलावून घेतले. तेथे त्याला बेदम मारहाण केली. त्याला बारावे येथील एकविरा देवीच्या मंदिरात नेऊन आईची माफी मागण्यास सांगितले. त्याच्या अंगावरील कपडे काढून त्याची त्या भागात धिंड काढली. या प्रकाराची दृश्यचित्रफित तयार करुन ती समाज माध्यमावर प्रसारित केली. हा प्रकार एका महिलेने पाहून तिने मोहीतच्या बहिणीला घटनास्थळी बोलविले. दोन्ही भावंडांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली.
जमावातील दर्शना पाटील, शर्मिला लिंबरे, ईजी डोंगरे, निकिता कोळी, समर्थ चेंडके, अभिजित काळे, प्रथमेश डायरे, साहील नाचणकर, कुणाल भोईर, नितीन माने, दीपक शिंदे, विजय कदम, सागर निळजेकर, विनय सुतार, जय भोईर, नितेश ढोणे यांच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला.