डोंबिवली- टाटा कंपनीत आपणास नोकरी लागेल यासाठी देण्यात येणाऱ्या मुलाखतीपूर्वी आपणास अनामत रक्कम भरावी लागेल, असे डोंबिवलीतील एका तरूणीला सांगून तिची मुलाखत, नोकरी नाहीच, पण तिची फसवणूक करणाऱ्या एका इसमा विरुध्द टिळकनगर पोलिसांनी या तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून घेतला आहे.

सोनाली प्रथमेश फाटक (२७) असे फसवणूक झालेल्या तरूणीचे नाव आहे. ती मानपाडा रस्त्यावरील पांडुरंगवाडी भागात राहते. आशीष राऊत असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोनाली फाटक यांना घरी असताना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर सीपी-मेटएचआरडी नावाने टाटा कंपनीत नोकरी देण्यासाठी एक जुळणी आली. ही जुळणी उघडताच त्यामधील आशीष राऊत या इसमाने आपण वरिष्ठ मनुष्यबळ विकास विभागाचा प्रमुख आहे असे सोनालीला सांगितले.

आशीषने तरुणीला तुला टाटा कंपनीमध्ये नोकरी मिळणार आहे. यासाठी तुला प्रथम मुलाखत द्यावी लागेल. मुलाखतीपूर्वी तुला १५ हजार ६५० रूपये अनामत रक्कम भरणा करावी लागेल असे सांगितले. आशीषच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन सोनालीने इसमाने दिलेल्या गुप्त संकेतांक खात्यावर रोख रक्कम भरणा केली. रक्कम भरणा केल्यानंतर सोनालीला समोरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आशीषच्या मोबाईलवर तिने संपर्क केला. तो बंद होता. आपली फसवणूक आशीष या इसमाने केली आहे याची खात्री झाल्यावर सोनालीने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Story img Loader