कल्याण : प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या असह्य त्रासाला कंटाळून टिटवाळा येथे तरूणीने राहत्या घरात आत्महत्या केली आहे. या तरूणीने आत्महत्येपूर्वी समाज माध्यमांवर दृध्यध्वनी चित्रफितीनेव्दारे प्रियकर आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून आपणास कसा त्रास दिला जात होता याची माहिती प्रसारित केली आहे.जोपर्यंत प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांना अटक होत नाही, तोपर्यंत मृत तरूणीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृत तरूणीच्या कुटुंबीयांनी घेतली आहे.
सुमन मच्छिंद्र शेंडगे (३२) असे मृत तरूणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मृत तरूणी सुमन आणि सचिन शास्त्री यांचे मागील दहा वर्षापासून प्रेमप्रकरण सुरू होते. आपण लग्न करून, संसार करू, अशी आश्वासने प्रियकर सचिन शास्त्री प्रेयसी सुमन यांना देत होता. आपण लग्न करणार आहोत, असे सांगून त्याने तिच्या बरोबर शारीरिक संबंध ठेवले होते. बरोबरचे प्रकरण सुरू असताना सचिन यांनी सुमनला काही कळू न देता एका तरूणीशी परस्पर लग्न केले. ही माहिती सचिन बरोबर लग्न केलेल्या तरूणीला समजली.
याप्रकरणानंतर सचिन आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुमन शेंडगेला विविध प्रकारे त्रास देण्यास सुरूवात केली. प्रियकर आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या त्रासाला सुमन आणि तिचे कुटुंबीय कंटाळले होते. मानसिक त्रास वाढल्याने अखेर सुमनने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. टिटवाळा पोलीस ठाण्यात सुमनच्या कुटुंबीयांनी तक्रार केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन सुमनच्या कुटुंबीयांना दिले आहे.