दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळीच्या निमित्ताने घरोघरी पुरणपोळीचे बेत शिजू लागले असून रंगपंचमीच्या तयारीलाही तरुण आणि लहान मुले लागली आहे. कल्याणच्या कोळीवाडा आणि भोईवाडा या कोळी वस्त्यांमधील होळीचे विशेष असे की अजूनही पारंपरिक पद्धतीने येथे होळी साजरी केली जाते. त्याचप्रमाणे उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक ओढ निर्माण होण्यासाठी केले जात आहे.
कल्याणच्या खाडीकिनाऱ्यावर कोळीवाडा आणि भोईवाडा या दोन कोळी समाजातील वस्त्या असून त्यामध्ये सुमारे साडेतीन हजारांहून अधिक कुटुंबे राहतात. या दोन्ही वस्त्यांमध्ये पेटवल्या जाणाऱ्या होळ्यांमध्ये प्रथा आणि परंपराही भिन्न आहेत. कल्याणच्या कोळीवाडय़ामध्ये एकादशीच्या दिवशी शिमगा उत्सवाची सुरुवात होत असून या दिवशी होळी उभी करण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. गणेश मित्र मंडळ, सागर क्रीडा मंडळ कोळीवाडा कल्याण, ओम साई गणेश मित्रमंडळ आणि एकवीरा महिला मंडळ या मंडळांच्या माध्यमातून कोळीवाडय़ातील शिमगा उत्सव साजरा केला जातो. कोळीवाडय़ातील पाटलाच्या घरातून वाजतगाजत बावटा म्हणजे ध्वज घेऊन होळीच्या ठिकाणी आणला जातो तर काटेसावर झाड होळीसाठी आणले जाते. कोळीवाडय़ातील गणपती मंदिराजवळच्या मैदानामध्ये होळी उभी केल्यानंतर शिमगा महोत्सव सुरू होतो. रोज रात्री खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असते, तर होळीच्या दिवशी पुरणपोळी आणि प्रत्येक घरातून येणारा नैवेद्य होळीला अर्पण करून पहाटेच्या वेळी समुद्राला येणाऱ्या भरतीच्या वेळी होळी पेटवून सण साजरा केला जातो. कोळीवाडय़ातील भगत शेलार, भोईर, कोळी आणि पाटील अशी सर्व मंडळी ग्रामीण परंपरागत हा उत्सव साजरा करत असली तरी त्यावर काही प्रमाणात मर्यादा येऊ लागल्याची कबुली ही मंडळी देतात. रात्री दहानंतर पोलीस परवानगी मिळत नसल्याने रात्री लवकर होळी साजरी करावी लागते. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा काळ लक्षात घेऊन होळीचे कार्यक्रमसुद्धा आटोपते घ्यावे लागतात, अशी माहिती कोळीवाडय़ातील आदिक शेलार यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा