अभिरुचिसंपन्न वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा या हेतूने गेले काही महिने नियमितपणे राबविण्यात येत असलेल्या शब्दयात्रा या उपक्रमात गेल्या रविवारी तरुणांच्या वाचनविश्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाविद्यालयात शिकत असलेल्या तरुणांनीच या वेळच्या शब्दयात्रेत आपापल्या आवडीच्या पुस्तकांविषयी मते मांडली. मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमातून आजची तरुण पिढी काय वाचते, कोणत्या प्रकारचे लिखाण या पिढीला आवडते, कोणते लेखक आवडतात यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली.
इंद्रधनु, जिज्ञासा आणि मराठी ग्रंथसंग्रहालय-ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने महिन्यातून एकदा ‘शब्दयात्रा’ उपक्रम राबविला जातो. निखील गोरे या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांने कार्यक्रमाची दमदार सुरुवात केली. गिरीश कुबेर यांच्या ‘एका तेलियाने’ या पुस्तकाचे त्याने रसग्रहण केले. पुस्तकातून व्यक्त होत असलेली मीमांसा अत्यंत डोळसपणे टिपत त्याने ती श्रोत्यांसमोर मांडली.
रसिका जोग या कलाशाखेच्या विद्यर्थिनीने ‘यु आर द पासवर्ड ऑफ माय लाइफ’ या इंग्रजी कादंबरीचे अत्यंत मनस्वी विश्लेषण केले. सध्या लोकप्रिय असलेल्या ‘सुदीप नगरकर’ यांची ही कादंबरी. त्यातल्या पात्रांमध्ये आपण कसे गुंतत जातो आणि अक्षरश: त्यांच्याबरोबर कसे जगत जातो याचे गहिरे वर्णन रसिकाने केले.
लघुकथासंग्रहांचे रसग्रहण
आश्लेषा पंडित या मास मीडियाच्या विद्यार्थिनीने तिची आवडती लेखिका ‘झुम्पा लाहिरी’ यांच्या ‘इन्टरप्रिटर ऑफ मेलाडिजस्’ या इंग्रजी लघुकथासंग्रहाचे रसग्रहण केले. लेखिकेची पाश्र्वभूमी आणि तिचे लिखाण यांचा काय संबंध असू शकतो, तसेच कोणतीही पाश्र्वभूमी असली तरी काही मानवीय अनुभव कसे सारखेच असू शकतात याचे वेधक वर्णन तिने केले.
‘दोस्त’ कथासंग्रहाचे अंतरंग
सेजल नातू या कलाशाखेच्या विद्यार्थिनीने व. पु. काळे यांच्या ‘दोस्त’ या कथासंग्रहाचे अंतरंग उलगडून दाखवले. वपुंच्या कथांमध्ये असलेली मध्यमवर्गीय संस्कृती जरी आता आसपास दिसत नसली तरी माणसांच्या स्वभावाचे पदर कायम असतात. त्यामुळे त्या लेखनाशी अगदी आजची तरुण पिढीही समरस होऊ शकते हे तिने अधोरेखित केले.
आदित्य जोशी या अभियांत्रिकीच्या रसायन शाखेच्या विद्यार्थ्यांने ‘ जेरुसलेम-एक चरित्रकथा’ या सविता दामले यांच्या अनुवादित पुस्तकाची निवड केली होती. तीन हजारवर्षांचा रक्तरंजित इतिहास वागवीत असलेले जेरुसलेम, त्या संघर्षांची राजकीय, सामाजिक कारणे, ज्यू समाजाची वैशिष्टय़े, अरब आणि ज्यू यांच्यातील सततचा तणाव इतक्या मोठय़ा विषयाचे त्याने अगदी सहज सोप्प्या मराठी शब्दात वर्णन केले.
प्रत्येकाने अगदी मोकळेपणाने त्यांच्या वाचनाच्या आवडीनिवडी सांगितल्या. काय वाचायला आवडेल हेही विशद केले. सगळे जण मनस्वीपणे आणि प्रगल्भतेने बोलले. ‘शब्द यात्रा’च्या प्रवासातील हा टप्पा खूपच महत्त्वाचा टप्पा असल्याचे संयोजकांनी नमूद केले.
शब्दयात्रेतून तरुणाईच्या वाचनछंदाचा प्रवास
गिरीश कुबेर यांच्या ‘एका तेलियाने’ या पुस्तकाचे त्याने रसग्रहण केले.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 06-04-2016 at 01:59 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth appreciation girish kuber book eka teliyane