कल्याण– कल्याण पूर्वेतील तिसगाव भागात बुधवारी रात्री एका तरुणाने एका अल्पवयीन तरुणीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला करुन तिला जिवे ठार मारले. या घटनेनंतर आपण पोलिसांच्या जाळ्यात अडकले जाऊ या भीतीने हल्लेखोर तरुणाने जवळील फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण पूर्वेतील मलंग गड रस्त्यावरील चेतना विद्यालय परिसरात राहणारा हल्लेखोर तरुण आदित्य प्रकाश कांबळे (२०) याच्या विरुध्द खून, आत्महत्येचा प्रयत्न असे दोन गुन्हे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये तरुणाच्या हल्ल्यात अल्पवयीन मुलीचा मृत्यू
बुधवारी रात्री हल्लेखोर आदित्य कांबळे याने तिसगाव भागात राहत असलेल्या एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला करुन तिला जिवे ठार मारले. मुलगी आपल्याशी बोलत नाही. आपणावर प्रेम करत नाही याचा राग तरुणाला होता. या तरुणीला धडा शिकवण्याचा प्रयत्नात हल्लेखोर होता. बुधवारी रात्री हल्लेखोर आदित्यने रात्री आठ वाजताच्या दरम्यान मयत मुलगी खासगी शिकवणी वर्गावरुन घरी कधी येते याची माहिती सोसायटीतील रहिवाशांकडून घेतली. तो माहिती का घेत आहे याचा अंदाज कोणाला आला नाही. आदित्य मयत मुलगी राहत असलेल्या दुर्गा देवी सोसायटीच्या परिसरात दबा धरुन बसला होता. मयत मुलगी आपल्या आई सोबत शिकवणी वर्गावरुन घरी रात्री आठ वाजता येत होती. जिन्यावरुन घरात जात असताना आदित्यने पाठीमागून धावत जाऊन मयत मुलीच्या आईला जोराने बाजुला ढकलले. मुलीच्या छातीवर धारदार चाकुने आठ वार करुन तिला गंभीर जखमी केले. आईने हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला. त्याने दाद दिली नाही. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिचा उपचार सुरू असताना डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले.