डोंबिवलीतील लोढा हेवन संकुलात नैराश्यातून एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनिकेत पवार असे या तरुणाचे नाव आहे. सुदैवाने अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच त्याला वाचवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अनिकेत कौटुंबिक, आर्थिक विवंचनेत असल्याने नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अनिकेतचे समुपदेशन करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
करोना महासाथीच्या काळात अनिकेतची नोकरी गेली. त्यानंतर पत्नीने त्याला सोडून दिले. त्यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या अनिकेतने जीवन संपविण्याचा विचार करुन इमारतीच्या बाराव्या माळ्यावरील सज्जात येऊन हालचाली सुरू केल्या. ही माहिती इतर रहिवाशांना समजताच त्यांनी तातडीने पोलीस,अग्निशमन दलाला ही माहिती दिली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अनिकेतने जीवाचे बरे वाईट करू नये म्हणून इमारतीच्या खाली एक संरक्षक जाळी लावली. या जाळीच्या सभोवती जवान उभे केले. काही जवान लांबलचक दोर घेऊन इमारतीच्या गच्चीत गेले.
अग्निशमन दलाचे जवान इमारतीच्या खालीच उभे आहेत असे अनिकेतला वाटले परंतु, जवानांनी गुप्त हालचाली करुन अनिकेतला काही समजणार नाही अशा पध्दतीने इमारतीच्या गच्चीत गेले. तेथे त्यांनी अनिकेतचे हातापासूनचे शरीर फासात अलगद अडकेल अशा पध्दतीने एक फास दोराला तयार केला. गच्चीमधून अनिकेतला काही समजणार नाही अशा पध्दतीने फास सज्जात बसलेल्या अनिकेतच्या दिशेने अलगद सोडला. सोडलेला फास अनिकेतच्या हातापासूनच्या भागाला अडकताच जवानांनी त्याला सज्जातून गच्चीच्या दिशेने खेचून घेत ताब्यात घेतले, अशी माहिती डोंबिवली अग्निशमन दलाचे प्रमुख नामदेव चौधरी यांनी दिली.