कल्याण: कल्याण जवळील म्हारळ गाव हद्दीतील तलावात (दगडांची खदान) शुक्रवारी संध्याकाळी याच भागातील एका २३ वर्षाच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. कल्याण आणि उल्हासनगर अग्निशमन दलाच्या पथकांनी शनिवारी सकाळी तरुणाचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. उमेश अंबादास सोनावणे (२३) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो म्हारळ येथील क्रांतिनगर भागात राहत होता. पावसामुळे म्हारळ गावाजवळील खदान पाण्याने भरली आहे. या खदानी जवळील धबधब्यावर शुक्रवारी संध्याकाळी उमेशसह त्याचे आठ मित्र फिरण्यासाठी गेले होते.

उमेश मित्रांना सागून आपले कपडे धुण्यासाठी खदानीवर गेला. तेथे त्याला पोहण्याचा मोह झाला. कपडे वाळत टाकल्यावर उमेशने खदानीत पोहण्यासाठी उडी मारली. खदानीमध्ये दगडांच्या कपारी असल्याने तो त्यात अडकला. उमेशने बचावासाठी ओरडा करताच मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी तेथे पडलेली दोरी टाकली. त्याचा आधार घेऊन उमेश एकवेळ वर आला. त्यानंतर तो बुडाला.

काठावरच्या एकाही मित्राला पोहता येत नव्हते. मित्रांनी तात्काळ उल्हासनगर पालिकेच्या अग्निशमन दलाला संपर्क केला. तेथून हद्दीचे कारण सांगून प्रतिसाद मिळाला नाही, असे तरुणांनी सांगितले. कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन दलाला ही माहिती देण्यात आली. त्यांनी रात्री उशिरापर्यंत उमेशचा शोध घेतला तो आढळला नाही. शनिवारी सकाळी कल्याण, उल्हासनगरच्या जवानांनी खदानीत शोध मोहीम राबविली. त्यावेळी उमेशचा मृतदेह आढळला. दहावीपर्यंत शिक्षण असलेला उमेश वाहन चालक म्हणून काम करत होता. उमेशच्या मागे आई, वडिल, भाऊ, बहिण असा परिवार आहे.

Story img Loader