ठाणे : मुंब्रा बाह्यवळण (बायपास) मार्गावर मंगळवारी पहाटे एका विचित्र अपघातात विष्णू पाल (२७) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. विष्णू पाल हे नवी मुंबई येथील महापेचे रहिवासी आहे. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक विष्णू पाल यांच्या कारला धडकला. त्यानंतर विष्णू यांची कार कंटेनरला धडकली. त्यामुळे विष्णू यांचा नाहक अपघाती मृत्यू झाला आहे.
याप्रकरणाची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात केली जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की, विष्णू यांच्या कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे.
मुंब्रा बायपास मार्गावरून मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास विष्णू पाल हे नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करत होते. ते मुंब्रा बायपासवरील टोलनाका परिसरात आले असता, एका ट्रक चालकाचे त्याच्या वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे या ट्रकची धडक विष्णू पाल यांच्या कारला बसली. त्यानंतर विष्णू पाल यांची कार त्यांच्या वाहनापुढे असलेल्या कंटेनरला धडकली.
घटनेची माहिती ठाणे वाहतुक पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस, अग्निशमन दलाचे जवान हे यंत्रणांसह घटनास्थळी दाखल झाले. ट्रक आणि कंटेनर वाहनाच्यामध्ये विष्णू यांची कार सापडल्याने कारचा अक्षरश: चुराडा झाला होता. तसेच विष्णु कारमध्येच अडकून होते. पथकांनी त्यांना कारमधून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातामुळे मुंब्रा बायपास मार्गावर काहीकाळ वाहतुक कोंडी झाली होती.