लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: येथील पूर्व भागातील काटेमानिवली मध्ये एका तरुणाची याच भागातील एका युवकाने पूर्ववैमनस्यातून धारधार चाकुचे वार करुन निर्घृण हत्या केली. रविवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तत्पर हालचाली करुन मारेकरी तरुणाला अटक केली.
अमोल लोखंडे (३९, रा. कांचन काॅलनी, समतानगर, काटेमानिवली, कल्याण) असे मयत तरुणाचे नाव आहे. जयेश उर्फ टाक्या डोईफोडे असे मारेकरी तरुणाचे नाव आहे. अमोल आणि जयेश यांच्यात यापूर्वी काही कारणावरुन वाद झाला होता. दरम्यानच्या काळात या विषयावर पडदा पडला होता. परंतु, जयेशच्या मनात अमोल विषयी राग होता.
हेही वाचा… रेल्वेत नोकरीच्या आमिषाने ६९ लाखांचा गंडा, दोघांविरुद्ध उल्हासनगरात गुन्हा दाखल
रविवारी रात्री जयेशने अमोलच्या हालचालींवर पाळत ठेऊन त्याला वस्तीत गाठून त्याची हत्या केली. हत्येनंतर जयेश पळून गेला. कोळसेवाडी पोलिसांना या प्रकरणाची माहिती अमोलच्या कुटुंबीयांनी दिली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करुन आरोपी जयेशला अटक केली.
कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख या प्रकरणाचा तपास करत आहेत. कल्याण पूर्व भागातील वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.