टिकूजीनी वाडी परिसरातील खाणीत साठलेल्या पाण्यात बुडून एक तरूण बेपत्ता झाला असून महापालिकेचा अग्निशमन विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रविवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली.
या खाणीत सध्या पाणी भरले असून येथे आपल्या दोन मित्रांसह पोहण्यासाठी आलेला अनिल खडकसिंग (२४) हा कुमाऊ चाळ, मानपाडा येथे राहणारा तरूण पाण्यात बुडून बेपत्ता झाला आहे. मद्याच्या अंमलाखाली पावसाळी सहलीसाठी आलेले हे तिघे तरूण पाण्यात उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने अनिल पाण्यात बुडाला. यावेळी त्यास त्याच्या मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. ही घटना समजताच अग्निशमन विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.