डोंबिवली- डोंबिवलीतील दत्तनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाचे एका तरुणीवर प्रेमसंबंध होते. तरुणीच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीला संबंधित तरुणा बरोबर विवाह करण्यास नकार दर्शविला होता. कुटुंबीयांनी तरुणाला हे लग्न होणार नाही, असे स्पष्ट शब्दात सुनावले होते. याचा राग आल्याने संतप्त झालेल्या तरुणाने तरुणीच्या कुटुंबीयांना अपहरणाच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी स्वताच्या अपहरणाचा डाव रचला. रामनगर पोलिसांनी तो हाणून पाडला.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील पाथर्ली येथे तीन वर्षाच्या मुलाला सावत्र आईने ठार मारले

नीलेश बांदल असे दत्तनगर मध्ये राहणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याचे एका तरुणी बरोबर प्रेम संबंध होते. तो तरुणीला विवाहसाठी गळ घालत होता. तरुणीने हा प्रकार आपल्या घरी सांगितला. कुटुंबीयांना त्यास नकार दिला. पुन्हा त्या तरुणा बरोबर संबंध ठेवायचे नाही असे स्पष्ट शब्दात बजावले होते. यामुळे अस्वस्थ झालेल्या तरुणाने तरुणीच्या कुटुंबीयांना धडा शिकवायचा निर्णय घेतला. त्याने स्वताच्या अपहरणाचा डाव रचला आणि हे अपहरण तरुणीच्या कुटुंबीयांनी घडून आणले असे दाखविण्याचा प्रयत्न केला.

नीलेशने स्वताचे अपहरण कोणीतरी केले आहे असा बनाव रचुन एक लघुसंदेश तरुणीच्या वडिलांच्या मोबाईलवर पाठविला आहे. नीलेश आमच्या ताब्यात आहे. हा प्रकार पोलिसांना सांगितला तर नीलेशचा मृतदेह पाहण्यास मिळेल, हा लघुसंदेश वाचून तरुणीचे वडील अस्वस्थ झाले. नीलेशचा आपला काही संबंध नसताना हा लघुसंदेश आपणास का आला म्हणून वडिलांनी तात्काळ रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन घडला प्रकार सांगितला.

हेही वाचा >>> रेल्वे, ओएनजीसी मध्ये नोकरीला लावतो सांगून कल्याण मध्ये डाॅक्टरची १२ लाखांची फसवणूक

एका तरुणाचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच रामनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची पथके नीलेशचा तपास करू लागली. वडिलांना आलेला लघुसंदेश आणि नीलेशचा मोबाईल यांचा माग काढून पोलिसांनी नीलेश ज्याठिकाणी होता त्याठिकाणी छापा मारला. त्यावेळी तेथे नीलेश एकटाच होता. तपास पथकांनी नीलेशला पोलीस ठाण्यात आणले. तुझे अपहरण करणारे कोठे आहेत. असे प्रश्न पोलिसांनी करताच नीलेश खरा प्रकार पोलिसांना सांगितला. तो प्रकार ऐकून पोलिसांचा संताप झाला. प्रेयसी तरुणीच्या कुटुंबीयांनी आपल्या विवाहाला नकार दिला आहे. त्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी आपण हा बनाव रचला होता, अशी माहिती नीलेशने पोलिसांना दिली. पोलिसांनी नीलेशला अटक केली आहे.

हा प्रकार ऐकून तरुणीचे कुटुंबीय आश्चर्यचकित झाले.

Story img Loader