डोंबिवली– काटई-बदलापूर पाईप लाईन रस्त्यावरील समाधान हाॅटेलच्या व्यवस्थापकावर दोन अनोळखी इसमांनी त्यांची दुचाकी अडवून चाकुने हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यांच्या खिशातील लाख रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन हल्लेखोर पळून गेले. सोमवारी रात्री ही घटना घडली.
मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी हाॅटेल व्यवस्थापकाने तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
राधेशाम रामनाथ सिंग (३७, रा. बाळक पाटील चाळ, लालचंद भोईर यांचे कार्यालया जवळ, कोळेगाव) असे गंभीर जखमी व्यवस्थापकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, तक्रारदार राधेशाम सिंग हे काटई-बदलापूर रस्त्यावरील समाधान हाॅटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. सोमवारी रात्री साडे अकरा वाजता हाॅटेलमधील कर्तव्य संपून ते कोळेगाव येथील आपल्या घरी दुचाकी वरुन जात होते. राधेशाम यांची दुचाकी कोळे गावातील गणपती कारखान्या समोर येताच, काटई नाका येथून बदलापूर दिशेेने दुचाकी वरुन जात असलेल्या दोन अनोळखी तरुणांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. काही अडचण असेल म्हणून त्यांनी थांबण्याची सूचना केली असावी असा गैरसमज करुन राधेशाम थांबताच, हल्लेखोर तरुणांनी राधेशाम यांच्या दुचाकी समोर आपली दुचाकी उभी केली.
हेही वाचा >>> उल्हासनगरः घरकामगार महिलेची ‘हातसफाई’ ; घरातून १३ लाखांची रोकड केली लंपास, गुन्हा दाखल
दुचाकी वरील एकाने काही कळण्याच्या आत राधेशाम यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. पोटावर चाकुचे वार केल्याने ते रक्तबंबाळ झाले. त्यांनी बचावासाठी ओरडा केला. तोपर्यंत तरुणांनी राधेशाम यांच्या खिशातील किमती मोबाईल काढून घेतला. काही रक्कम मिळते का चाचपडून ते पळून गेले. रात्रीतून व्यवस्थापक राधेशाम यांनी मानपाडा पोलीस ठाणे गाठले. दोन अनोळखी तरुणां विरुध्द मानपाडा पोलीस ठाम्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. हल्ला झाला त्या परिसरात कोठे सीसीटीव्ही कॅमेरे होते का याचा तपास पोलीस करत आहेत. राधेशाम हे व्यवस्थापक असल्याने त्यांच्या जवळ पैसे असावेत या विचारातून त्यांना लुटण्याचा डाव तरुणांचा असावा. त्यामधून ही घटना घडली असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला आहे.