अंबरनाथ : ‘वाढदिवसाला बॅनर, होर्डिंग कमी पडले असते मात्र लोकशाहीच्या उत्सवाचा एकही बॅनर नाही, कुठे आहेत भावी नगरसेवक ?’, असा प्रश्न उपस्थित करणारे फलक घेऊन प्रजासत्ताक दिनी अंबरनाथमधील काही तरूणांनी लक्ष वेधले. गेल्या काही वर्षात कोणत्याही निमित्ताने फलकबाजी करण्यात कोणताही राजकीय पक्ष माग नसतो. मग प्रजासत्ताक दिनी हे सर्व राजकीय नेते, पदाधिकारी कुठे गेले असा प्रश्न या तरूणांनी उपस्थित केला.
गेल्या काही वर्षात फलक, बॅनर किंवा होर्डिंग लावण्यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. अनेकदा तर लहान मुलांचे बारसे, वाढदिवस, नवी कोरी घेतलेली गाडी, बैल, पाळीव प्राणी अशा सर्वांच्या महत्वाच्या दिनी बॅनर लावले जातात. राजकीय कुरघोडी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या एका गटाने संपूर्ण शहरभर एका राजकीय घराण्यातील व्यक्तीचे वाढदिवसानिमित्त शहरभर बॅनर लावले होते. बॅनर लावणाऱ्या नेत्याचेही इतके बॅनर कधी लावले नसावेत, अशी प्रतिक्रिया नागरिक देत होते. मात्र असे असताना प्रजासत्ताक दिनानिमित्त आजी माजी नगरसेवक, इच्छुक नगरसेवक, भावी नगरसेवक अशा कुणाचेच बॅनर दिसले नाहीत. असे सांगत अंबरनाथमधील भारत डावरे, प्रशांत गिरबीडे आणि प्रथमेश कंबळे यांनी हातात फलक घेत प्रश्न उपस्थित केला. वाढदिवसाच्या बॅनरांना मिळणारे महत्त्व आणि प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाला मिळणारी उपेक्षा यावर त्यांनी गंभीर विचार मांडला आहे. फलक घेऊन रस्त्यावर उभे राहणारे हे तरूण येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालक, प्रवासी आणि पादचाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.