चायनीज म्हटले की डोळ्यासमोर येतात ते चिकनच्या जोडीला बनवलेले विविध पदार्थ. मात्र अनेकदा या मांसाहारी चायनीज पदार्थामुळे शाकाहारी माणसांची पंचाईत होते. त्यात अनेकदा मांसाहारी चायनीज पदार्थ आणि शाकाहारी पदार्थ एकाच भांडय़ात तयार होत असल्याने शाकाहारीचे पावित्र्य जपले जात नसल्याच्याही तक्रारी समोर येत असतात. त्यामुळे चायनीज पदार्थ मिळत असलेल्या ठिकाणी शाकाहारी व्यक्ती सहसा काही खात नाही. हीच समस्या समोर ठेवून बदलापुरात संपूर्ण शुद्ध शाकाहारी चायनीज कॉर्नर सुरू करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांत बदलापूर शहर झपाटय़ाने विस्तारित आहे. येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. निरनिराळ्या प्रदेशांतील लोक येथे स्थायिक होऊ लागले आहेत. त्यामुळे मूळचे ‘गाव’पण मागे पडून त्याला बहुभाषिक शहराचा नवा चेहरा आकाराला येऊ लागला आहे. या संक्रमणात सांस्कृतिक आणि सामाजिक बदलांबरोबरच येथील खाद्यसंस्कृतीही बदलत आहे. त्यातूनच सकाळ-संध्याकाळच्या हलक्या नाश्त्याची अनेक केंद्रे बदलापूरमध्ये तयार होऊ लागली आहेत. बदलापूर पूर्वेतील शिवाजी चौकापासून अवघ्या काही पावलांवर महाडिक हॉस्पिटलसमोर असलेला युवा स्नॅक्स कॉर्नर त्यापैकी एक. या कॉर्नरचे वैशिष्टय़ म्हणजे इथे शुद्ध शाकाहारी चायनीज पदार्थ मिळतात. गेली वीस वर्षे शाकाहारी जेवणावळी उठवणाऱ्या पुरकर कुटुंबाने या युवा चायनीज कॉर्नरला सुरुवात केली आहे. आसावरी पुरकर यांनी शुद्ध शाकाहारी खवय्यांना समोर ठेवून हा प्रयोग सुरू केला आहे. बदलापुरातील अनेक शाकाहारी खवय्ये सायंकाळी बाहेर फेरफटका मारताना या युवा स्नॅक्स कॉर्नरला भेट देत असतात. खास पठडीतले आदरातिथ्य हे पुरकर कुटुंबीयांचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे इथे खवय्यांचे प्रसन्नतेने स्वागत होते. इथे चायनीज पदार्थातील विविध सूप्स, राइस, ग्रेव्ही राइस, नूडल्स, दोहोंमधील ड्राय डिशेस, पनीर डिश आदी पदार्थ चाखायला मिळतात. त्यात सूपमध्ये टोमॅटो, मनचाव, स्वीट कॉर्न, मशरूम आणि युवांसाठी युवा स्पेशल सूपही येथे उपलब्ध आहेत. राइस आणि नूडल्सचे विविध प्रकारही इथे उपलब्ध आहेत. त्यात शेजवान कॉम्बिनेशन, पनीर राइस, गार्लिक राइस, मशरूम आणि चिली या पदार्थाना चांगली मागणी असल्याचे देवव्रत पुरकर सांगतात. हे सर्व पदार्थ ग्रेव्हीसह वेगळ्या रूपातही येथे खायला मिळतात. त्यामुळे इतर चायनीज कॉर्नरमध्ये जबरदस्तीने दिले जाणारे हे पदार्थ इथे टाळले जातात. स्टार्टरचीही वेगळी यादी येथे आपल्याला चाखायला मिळते. मंच्युरीयन, शेजवान, गार्लिक यांच्यातील विविध स्टार्टर प्रकारांसह पनीरमधील विविध स्टार्टर येथे आपल्याला उपलब्ध आहेत. क्रिप्सी, चोप्सी आणि व्हेज लॉलीपॉपलाही येथे चांगली पसंती मिळत असल्याचे आसावरी पुरकर सांगतात. पनीर प्रकारातील सर्वच चायनीज पदार्थ खवय्यांना येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे पनीर आवडणाऱ्यांचा इथे हिरमोड होत नाही. पनीरमधील पनीर चिली, पनीर ट्रिपल राइस या पनीर पदार्थाना चांगली पसंती मिळते. तसेच व्हेज-६५, युवा स्पेशल राइस आणि नूडल्स यांनाही खवय्यांची चांगली पसंती मिळत असल्याचे आसावरी पुरकर सांगतात. येथील दरही सर्वसामान्यांना परवडणारे असल्याने खिशाला त्याचा फटका बसत नाही. खाद्यमैफलीच्या नमनालाच घेतले जाणारे सूप इथे साधारण ३५ ते ८० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. राइस आणि नूडल्स प्रकारही ४५ ते १०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. स्टार्टर आणि ग्रेव्ही डिशमध्ये ९० रुपयांपासून सुरुवात होते, तर पनीर आणि मशरूममध्ये १६० रुपयांपर्यंत ड्राय आणि ग्रेव्हीसह स्टार्टर डिश मिळतात. त्यामुळे स्वस्तात सायंकाळचा नाश्ता इथे उपलब्ध होतो. संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंतच ही शाकाहारी चायनीजची मेजवानी बदलापूरकरांसाठी उपलब्ध आहे.
त्यात शीतपेय, कॉफीचेही विविध प्रकार इथे उपलब्ध आहेत. एसप्रेसो, कोल्ड कॉफी, कॅपेचिनो, स्टीम मिल्क असे पेयही येथे उपलब्ध असल्याने खवय्यांचा नाष्टा परिपूर्ण होतो. सायंकाळी एका निवांत क्षणी मोकळ्या वातावरणात बसण्यासाठी युवा स्नॅक्स कॉर्नर हा एक उत्तम पर्याय बदलापूरकरांना आता उपलब्ध झाला आहे.
युवा स्नॅक्स कॉर्नर
- कुठे?:- महाडिक हॉस्पिटलसमोर, अरुणोदय शॉप क्र. ३, शिवाजी चौक, बदलापूर (पूर्व)