ठाणे : पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे असणे आवश्यक असते. परंतू, ठाणे शहरातील अनेक मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंगच्या पट्टया पुसट झाल्याचे दिसत आहे. या पट्ट्या पुसट झाल्यामुळे वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन करत झेब्रा क्रॉसिंगच्या रेषेवर गाड्या थांबविल्या जात आहेत. परिणामी, त्याचा त्रास पादचाऱ्यांना होत असून त्यांना रस्ता ओलांडण्यास अडचण येत असल्याची माहिती समोर आली आहे.
झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यांचा रंग यापूर्वी काळा- पांढरा होता. परंतू, या रंगाच्या पट्ट्या प्रवाशांना आणि पादचाऱ्यांना दिसत नसल्याने ठाणे महापालिका आणि वाहतूक विभागाने संयुक्तपणे झेब्रा क्रॉसिंग पट्ट्यांचा रंग लाल-पांढरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ठाणे पालिका हद्दीतील रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंगचा रंग २०२३ अखेरीस पासून बदलण्यात आले. या पट्ट्या लाल आणि पांढऱ्या रंगाच्या केल्याने नागरिकांना स्पष्टपणे दिसतील. तसेच रस्त्यांवरील गाड्या झेब्रा क्रॉसिंगवर आल्यास त्यांना पांढऱ्या -लाल रंगाच्या पट्ट्या दिसतील आणि चालक नियमांचे पालन करून आपल्या गाड्या योग्य ठिकाणी थांबवतील. तर,पादचाऱ्यांनाही रस्ता ओलांडण्यास सोयीस्कर होईल असा समज महापालिका आणि वाहतूक विभागाला झाला होता. सुरुवातीच्या काळात या पट्ट्या ठळकपणे दिसत होत्या. त्यामुळे वाहतूक पोलिसांनाही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करणे शक्य होत होते. परंतू, एक ते दीड वर्षातच शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरील या पट्टयांचा रंग पुसट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
नितीन कंपनी जंक्शन या भागात वाहनांचा मोठय़ा प्रमाणात राबता असतो. या ठिकाणी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्गाची व्यवस्था आहे. परंतू, भूयारी मार्गातून जाणे थोडे किचकट आणि अधिक वेळ लागणारे असल्यामुळे बरेच नागरिक रस्ता ओलांडून जाणे पसंत करतात. नितीन कंपनी जंक्शन महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर आहे. एक ते दीड वर्षापूर्वीच या जंक्शनवर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. वाहतुकीच्या नियमाप्रमाणे रस्त्यावरील प्रत्येक सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग असणे गरजेचे आहे. परंतू, या सिग्नलवरील झेब्रा क्रॉसिंगच्या रेषा दिसेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करत अनेक वाहन चालक झेब्रा क्रॉसिंगच्याच्या रेषेवर वाहने उभे करत आहे. याकडे वाहतूक विभागाचे देखील दुर्लक्ष होत आहे. यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यास अडचण होत आहे. अशीच परिस्थिती गावदेवी परिसर, नौपाडा, खोपट, जांभळी नाका, तीनहात नाका, कॅडबरी जंक्शन तसेच घोडबंदर भागातील काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. यासंदर्भात, ठाणे महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
झेब्रा क्रॉसिंगच्या रेषांवर रंग मारण्यासाठी वाहतूक विभागाकडून दर तीन महिन्यांनी ठाणे महापालिकेला पत्रव्यवहार केला जातो. त्यानुसार, पत्रव्यवहाराला प्रतिसाद देऊन महापालिकेकडून झेब्रा क्रॉसिंगच्या रेषांवर रंग मारण्यात येतो. परंतू, तरी शहरातील ज्या भागात असे आढळून येत असेल तर, त्या त्या भागातील सहाय्यक आयुक्त आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांनी दर दोन ते तीन महिन्यांनी रस्त्यांची पाहणी करुन झेब्रा क्रॉसिंगला रंग देण्याचे काम करणे अपेक्षित आहे.
पंकज शिरसाट, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा