सिग्नल नसलेल्या कल्याण-डोंबिवलीत रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांची दैना
‘रस्ता ओलांडताना नेहमी झेब्रा क्रॉसिंगचा वापर करावा’ असे धडे नागरिकशास्त्रातून पूर्वापार दिले जात असले तरी हे शास्त्र कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाला मात्र ठाऊकच नसल्याची परिस्थिती आहे. वाढत्या वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी एकीकडे रस्ते रुंदीकरणाचे प्रस्ताव आखले जात असताना पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी कल्याण आणि डोंबिवलीतील एकाही रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगची व्यवस्था करण्यात आलेली नाही. आधीच शहरातील सिग्नल यंत्रणा पूर्णपणे बंद असल्याने वाहनांच्या वर्दळीवर नियंत्रण राहिलेले नाही. त्यातच झेब्रा क्रॉसिंगचीही सोय नसल्याने रस्ते ओलांडताना कल्याण-डोंबिवलीकरांची अक्षरश: ससेहोलपट सुरू आहे. वाहनांनी गजबजलेले रस्ते ओलांडताना पादचाऱ्यांना अपघात झाल्याच्या घटनाही वेळोवेळी समोर येऊ लागल्याने ‘झेब्रा क्रॉसिंग’चा मुद्दा महत्त्वाचा ठरू लागला आहे.
शहरांतील वाहतूक व्यवस्थेचे चांगले नियमन व्हावे या उद्देशाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये एक लेखाशीर्षक असून त्यामध्ये लाखो रुपयांची तरतुद केली जाते. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये वाहतूक नियंत्रण आणि झेब्रा क्रॉसिंगसाठी विशेष लेखाशीर्षक असून गेल्या वर्षी त्यामध्ये १० कोटी ७७ लाखांची तरतूद करण्यात आली होती. यंदा हीच तरतूद सुमारे ६ कोटी ५४ लाख रुपयांची करण्यात आली आहे. असे असले तरी गेल्या वर्षी कल्याण-डोंबिवलीतील मुख्य रस्त्यांवर एकही झेब्रा क्रॉसिंग आखण्यात आला नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कल्याण शहरातील महत्त्वाचा आग्रा रोड, मुरबाड रोड, संतोषी माता रोड या महत्त्वाच्या रस्त्यांवर
एकही ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आखलेले नाहीत. कल्याण-डोंबिवली महापालिकेपासून केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवाजी चौक हा सर्वाधिक गर्दीचा भाग असून तेथून एकाच वेळी वाहने आणि पादचारी रस्ता ओलांडत असतात. मात्र झेब्रा क्रॉसिंग नसल्याने कुणी, कधीही रस्ते ओलांडत असल्याचे दिसून येते. कल्याण शहरात दुर्गामाता चौक, सहजानंद चौक, लालचौकी, शिवाजी चौक, काबुलसिंग मार्ग, गुरुदेव जंक्शन, वल्लीपीर मार्ग, सुभाष चौक, नेहरू चौक, काटेमानिवली जंक्शन, महात्मा फुले चौक अशा एकूण अकरा ठिकाणी सिग्नल बसवण्यात आले होते. मात्र तेही बंद असून या भागात झेब्रा क्रॉसिंगची सर्वाधिक गरज आहे. मात्र त्यांच्यामध्ये अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नसल्याने त्याचा फटका पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
प्रशासकीय टोलवाटोलवी
कल्याण शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजबारा उडाला असून कल्याणच्या रस्त्यावरून प्रवास करणे वाहनचालक, पादचारींसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. खड्डेमय रस्ते, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, अवजड वाहनांच्या रांगा अशी कल्याणच्या सर्वच रस्त्यांची अवस्था आहे. वाहतूक नियमनासाठीच्या अवश्यक सुविधा महापालिका पुरवू शकत नसल्याने ही कोंडी अधिकच वाढत आहे. महापालिका प्रशासन पुरेसे सहकार्य करत नसल्याने वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे, असा आरोप गेली अनेक वर्षे वाहतूक पोलिसांकडून होत आहे. तर गोविंदवाडी बायपास पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडी सुटेल असे उत्तर गेल्या पाच वर्षांपासून पालिका प्रशासन नागरिकांना देत असले तरी सिग्नल यंत्रणेच्या सुधारणेविषयी मात्र टोलवाटोलवीच करत आहे.

 

Story img Loader