आपली सावली कधीही आपली साथ सोडीत नाही, असे म्हटले जाते. परंतु, ते शंभर टक्के सत्य नाही. कारण, वर्षातील असे दोन दिवस असतात की ज्या दिवशी भर दुपारी काही क्षण आपली सावलीही आपली साथ सोडून देते. या दिवसांना ‘शून्य सावलीचा दिवस’ असे म्हटले जाते. त्याचाच अनुभाव उद्या, १७ मे रोजी ठाणे, डोंबिवली, कल्याणकरांना घेता येणार आहे. प्रसिद्ध खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मकर वृत्त आणि कर्कवृत्त प्रदेशात दोन वेळा असे प्रसंग शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. स्थळांचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती समान झाली तर मध्यान्हकाली सूर्य बरोबर डोक्यावर येतो आणि आपली सावली दिसेनाशी होते. ठाण्यात बुधवारी १७ मे रोजी अक्षांशाएवढीच सूर्याची क्रांती असणार आहे. त्यामुळे मध्यान्ही १२.३५ मिनिटांनी सूर्य डोक्यावर येणार आहे . त्यामुळे सावली दिसणार नाही”, अशी माहिती दा. कृ. सोमण यांनी दिली.

बुधवार १७ मे रोजी मध्यान्ही ठाणेकरांना शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. दुपारी १२ वाजता घंटाळी मैदान नौपाडा ठाणे येथे मराठी विज्ञान परिषदेतर्फे शून्य सावलीचे प्रात्यक्षिक दाखवून संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण व कार्यवाह प्रा. ना. द. मांडगे मार्गदर्शन करणार आहेत.

शून्य सावली दिवस म्हणजे नेमकं काय?

सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या  २३.५०° दक्षिण आणि उत्तरेकडे असतो म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त यादरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो. त्यामुळे वर्षातून दोनदा शून्य सावली दिवस येतात. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा. तसेच सूर्य दररोज ०.५० ° सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर २ दिवस राहतो,त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते. भारताचा विचार केल्यास अंदमान-निकोबार बेटावर इंदीरा पॉइंट येथे ६.७८° अक्षवृत्तावर ६ एप्रिल आणि ५ सप्टेंबर रोजी दुपारी सूर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो. पुढे १० एप्रिल आणि १ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथे शून्य सावली दिवस येतो तो दक्षिण भारतात तेलंगणा येथे २ मे पर्यंत विविध अक्षवृत्तावर असलेल्या शहरात अनुभवता येतो.

हेही वाचा >> गडचिरोली जिल्ह्यातील “ही” गावे अनुभवणार शून्य सावली दिवस; अनेकांच्या मनात कुतूहल

अजून कोठे अनुभवता येणार ?

गडचिरोलीच्या अहेरी, हेमलकसा, आलापल्ली येथे १७ मे दुपारी १२.४ वाजता शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता येईल. एटापल्ली, मुलचेरा येथे १८ मे १२.५ वाजता, घोट चामोर्शी येथे १९ मे १२.६ वाजता, जिरमतारी येथे २० मे १२.५, गडचिरोली, लेखामेंढा येथे २१ मे १२.५ वाजता, आरमोरी येथे २२ मे तर देसाईगंज आणि कुरखेडा येथे २३ मे रोजी दुपारी १२.७ मिनिटांनी शून्य सावली अनुभवता येणार आहे.

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zero shadow day thanekar can experience zero shadow day but how where find out rno news sgk
Show comments