भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी तसेच गाव व पाड्यांजवळ नवीन जलस्त्रोत निर्माण व्हावा, या उद्देशातून ठाणे जिल्हा परिषदेने पाच तालुक्यांच्या हद्दीत एक हजार वनराई बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. डोंगर, खोऱ्यातून वाहणारे पावसाचे पाणी दगड, वाळुच्या पिशव्यांनी लोकसहभागातून अडविण्यात येणार आहे.
हेही वाचा- ठाणे शहरात महापालिकेकडून ‘गोवर रुबेला’ विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम प्रशासनाने हाती घेतला आहे. कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ आणि उल्हासनगर तालुक्यांमधील डोंगर, माळरान क्षेत्रात हे बंधारे बांधले जाणार आहेत. भूजल पातळी बरोबर गोधन, जंगली प्राण्यांना पिण्यासाठी जंगलात पाण्याचे साधन तयार व्हावे. जमिनीची धूप रोखणे आणि बंधारा परिसरात नवीन झाडांची लागवड करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
गटविकास अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ही कामे केली जाणार आहेत. गाव, खेड्यात घराघरांच्या परिसरात कुपनलिका बसविण्यात आल्या आहेत. कुपनलिकेला पाणी लागत नाही म्हणून अनेकांनी या नलिका ५०० ते ६०० मीटर नियमबाह्य खोदल्या आहेत. यामुळे बेसुमार पाण्याचा उपसा जमिनीतून होत आहे. वाढत्या उपशामुळे भूजल पातळी कमी होत आहे. मार्च नंतर बहुतांशी गावांमध्ये पाणी टंचाई सुरू होते. हे पाणी टंचाईचे भीषण संकट दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन गाव, पाड्यांच्या परिसरात वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन केले आहे.
हेही वाचा- साहाय्यक आयुक्त बदलताच डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर पुन्हा फेरीवाल्यांच्या विळख्यात
कल्याण तालुक्यात १००, अंबरनाथ १००, मुरबाड, शहापूर भाग डोंगराळ असल्याने या भागात प्रत्येकी ३०० बंधारे, भिवंडी भागात २०० बंधारे बांधण्यात येणार आहेत. या उपक्रमात पंचायत समितीच्या कृषी विभागाचे कर्मचारी, स्थानिक बचत गट महिला सदस्या, ग्रामसेवक, स्थानिक सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय विद्यार्थ्यांना सहभागी केले जाणार आहे, असे कल्याण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अशोक भवारी यांनी सांगितले.
कल्याण तालुक्यात नडगाव, म्हसकळ, आपटी, कोसले, अंताडे, बापसई, उशीद, कोलम, पोई, नालिंबी, रेवती, आंबिवली, वावेघर, वसतशेलवली येथे एकूण ३३ वनराई बंधाऱ्यांची बांधणी पूर्ण झाली आहे. पाण्याचे महत्व लोकांना कळावे यासाठी गाव पातळीवर जल संवर्धन अन्य उपक्रम लवकरच हाती घेतले जाणार आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मुरबाड, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ मध्ये बंधारे बांधण्याची कामे वेगाने सुरू आहेत.
हेही वाचा- कल्याण: देसई खाडी पुलावर तुळई ठेवण्याच्या कामासाठी शिळफाटा रस्ता रात्रीच्या वेळेत आठ दिवस बंद
नागरिकांना पाण्याचे महत्व कळावे. वाढत्या उपशामुळे भूजल पातळी कमी होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा किती वापर केले पाहिजे याचाही विचार यानिमित्ताने केला जाईल. हा उद्देशातून वनराई बंधारे उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांनी दिली.